२५ वर्षांत कधी नव्हते असे पीक आले पण दृष्ट लागली...स्वप्नांवर पाणी फिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:14 PM2019-11-06T13:14:10+5:302019-11-06T13:18:22+5:30
पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) : मागील २५ वर्षांत कधी नव्हती अशी पिके आल्याने किती माल निघेल आणि किती नाही, असे वाटत असताना दृष्ट लागल्यासारखे झाले. २०-२५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगताना तालुक्यातील घळाटवाडीचे शेतकरी रडकुंडीला आले होते.
प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता शेतकरी त्यांच्या व्यथा मांडत होते. घळाटवाडी परिसरात चार- पाच वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र यावर्षी अनियमित असूनही गरजेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे पीक परिस्थिती अतिशय उत्तम होती. सोयाबीन व बाजरी काढायला आली होती तर कापूस फुटला होता. परंतु २०-२५ दिवसांपासून मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. या गावच्या उत्तरेला असलेल्या घळाटी नदीला अनेक वेळा पूर आल्याने आजूबाजूच्या शेकडो हेक्टर जमिनीतील वाहून गेलेली पिके नदीकाठच्या बाभळीच्या झाडांना अडकलेली होती. तर सोयाबीन खाली गळाल्याने अनेक शेतात सोयाबीन पुन्हा उगवलेले दिसले. काही शेतकऱ्यांनी थोडाफार वेचलेला कापूस वाळू घातला, पण त्याच्याही फकड्या झाल्या होत्या.
स्वप्नांवर पाणी...
मी मागील चाळीस वर्षांपासून शेती करीत असून माझ्या बघण्यात अशी पिके आली नाहीत. ५-६ वर्षांच्या दुष्काळानंतर चांगली पिके आल्याने यावर्षी आपण कर्जमुक्त होऊ, असे वाटले होते; परंतु हे नियतीला मान्य नव्हते. माझ्याकडे सोळा एकर जमीन असून, दहा ते बारा लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबून होती. महिन्यापासून हाताला काम नाही. आता काय खावे, अशी अवस्था झाल्याचे प्रकाश माने म्हणाले. मागील अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात ओल असल्याने शेतात काम करणे अवघड झाले. महिन्यापासून आम्हाला रोजगार मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे गणेश माने व शाम काळे यांनी सांगितले. ओला कापूस वेचायलाही मजूर मिळणे अवघड झाले आहे, असे शेतकरी केशव पठाडे यांनी सांगितले.