हरायला काही नव्हतचं, फक्त लढायचं होतं; शेतकरीपुत्र अक्षय मुंडेची यूपीएससीवर मोहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:39 IST2025-04-23T12:38:03+5:302025-04-23T12:39:28+5:30
UPSC परीक्षेत देशभरातून 699 वा क्रमांक मिळवणाऱ्या डॉ. अक्षय मुंडे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे.

हरायला काही नव्हतचं, फक्त लढायचं होतं; शेतकरीपुत्र अक्षय मुंडेची यूपीएससीवर मोहर
- संजय खाकरे
परळी : "आई इंदुबाई मुंडे हिने शेतात राबत माझ्या शिक्षणाकडे लक्ष दिले. ती आजही शेतात काम करते. स्वतः निरक्षर असली तरी तिने मला घडवले. माझ्या यशामागे तिचा मोलाचा वाटा आहे. आज मी यशस्वी झालो आणि आईचा चेहरा आनंदाने फुलला, हेच माझे खरे यश आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवलेल्या पांगरी (गोपीनाथ गड) येथील डॉ. अक्षय संभाजीराव मुंडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
UPSC परीक्षेत देशभरातून 699 वा क्रमांक मिळवणाऱ्या डॉ. अक्षय मुंडे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षय यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे. लहानपणीच पितृछत्र हरवले. घरची परिस्थिती बेताची होती. बारावीत असतानाच काहीतरी मोठं करून दाखवायचं हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अभ्यासाला स्वतःला झोकून दिलं.
परळी – बीड मार्गावरील पांगरी (गोपीनाथ गड) येथील रहिवासी असलेल्या अक्षय यांचे शिक्षण स्थानिक संत भगवान बाबा विद्यालयात (इयत्ता १ ली ते १० वी) झाले. पुढे अकरावी-बारावी परळी येथील न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये, तर बीडीएसचे शिक्षण लातूरमधील एमआयटी कॉलेजमध्ये पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात काही काळ क्लास लावले आणि नंतर थेट नवी दिल्ली गाठून तेथे तयारी सुरू ठेवली. अखेर अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत देशभरातून 699 वा क्रमांक मिळवत गौरव संपादन केला. अक्षय मुंडे यांनी सहाव्या प्रयत्नात ही यश मिळवले आहे.
अक्षय यांच्या यशात त्यांच्या आईसोबतच बहिणीचा, अक्षता हिचाही मोठा वाटा आहे, असे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या या यशामुळे पांगरी गावासह परळी तालुक्यातील अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असून, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.