राज्यातील ऊसतोड कामगारांचे होणार सर्वेक्षण; बीडमधून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:51+5:302021-09-19T04:34:51+5:30
सोमनाथ खताळ बीड : गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यासाठी मजूर ...
सोमनाथ खताळ
बीड : गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाचे कामकाज गतिशील करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यासाठी मजूर ऊसतोडणीला जाण्यापूर्वी राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याची सुरुवात बीडमधून होणार असून, ३५ मुद्यांची माहिती घेऊन ५ ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ८० हजार कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळही स्थापन केले आहे. याचे कामकाज गतिशील करून कामगारांना सर्व योजना आणि सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्याच्या सूचना मंत्री धनंजय मुंडे यांनी १७ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांना दिल्या. इतर जिल्ह्यांत सर्वेक्षण करण्यापूर्वी बीडमध्ये जास्त कामगार असल्याने बीडमधूनच याची सुरुवात होणार आहे. ही सर्व जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी याबाबत सर्वांना पत्रही काढले आहे.
--
शाळेत प्रवेश अन् हेल्थ कार्डही
हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उघडलेल्या शाळांत प्रवेश देण्यात येणार आहेत, तसेच कामगारांना ओळखपत्र, हेल्थ कार्ड, युनिक आयडेंटी क्रमांकही दिला जाणार आहे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही दिला जाणार आहे. जवळपास ३५ मुद्यांची माहिती एका विहित नमुण्यात घेतली जाणार आहे.
-----
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार आहे. ही जबाबदारी ग्रामसेवकांवर दिली आहे. कामगारांनी सर्व माहिती बिनचूक द्यावी. भविष्यात योजनांचा लाभ देण्यास मदत होईल.
डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड