रानमेव्याच्या शोधात येतात,संधी साधून डल्ला मारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:36+5:302021-02-15T04:29:36+5:30
कडा : आष्टी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून आजूबाजूला चाकचोळा घेत कोणी नसल्याची खात्री होताच भरदिवसा घरात घुसून चोरी होण्याचे ...
कडा : आष्टी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून आजूबाजूला चाकचोळा घेत कोणी नसल्याची खात्री होताच भरदिवसा घरात घुसून चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. भुरट्या चोरांचे रॅकेट जेरबंद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी ढोबळे यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री तर सोडा पण दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून चोरी होण्याच्या घटना पाटण, सांगवी, धानोरा, डोंगरगण, अंभोरासह अनेक ठिकाणी घडल्या आहेत. शेतकरी दहा पाच व पोटात पोट केलेल्या सोन्याचा आधार मागेपुढे कामाला येईल म्हणून जपून ठेवतात, पण गावोगाव मोहळाचा मध शोधण्यासाठी एकाच दुचाकीवर चार चार जण फिरतात. गावात फिरताना नजर ठेऊनच असतात आणि कोणी नाही याची खात्री होताच त्या ठिकाणी चाकचोळा घेऊन दिवसाढवळ्या घरात चोरी करून निघून जातात. हे चोरटे सराईत नसून भुरटे आहेत. ही टोळी जेरबंद करावी अशी मागणी रवि ढोबळे यांनी केली आहे.
याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता, दिवसाढवळ्या घरफोडीचे प्रमाण वाढले असून दुपारी दोन ते पाच वेळेत हद्दीतील पोलीस ठाण्यात नाकेबंदी करणार आहोत. त्याचबरोबर ठाणे अंमलदार यांना गावोगाव जाऊन सरपंच ग्रामस्थांना जागृत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सावधगिरीसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.