बायकोचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोरल्या दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:57 AM2019-02-01T11:57:31+5:302019-02-01T11:58:55+5:30
पोलिसांनी तीन चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
- सोमनाथ खताळ
बीड : खाजगी नोकरीच्या पैशावर बायकोची ‘हौस’ पूर्ण होत नाही. मग तिला श्रीमंत आहोत, असे दाखविण्यासाठी आणि ‘इम्प्रेशन’ पाडण्यासाठी तरूणांनी चुकीचा मार्ग अवलंबला. पुण्यासह मराठवाड्यातील दुचाकी चोरून आलेल्या पैशांमध्ये ‘व्हीआयपी’ कार घ्यायची आणि त्याच कारमधून बायकोला ‘सफर’ घडवून आणण्याचा प्लॅन बीड पोलिसांनी उधळून लावला आहे. तीन चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई एलसीबी आणि पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली.
सुशांत मुंडे (२१ रा.साळींबा, ता.वडवणी), गणेश मुंडे (२२ रा.धारूर) व सुनील (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी आरोपींची नावे आहेत. सुशांत हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील दुचाकी चोरीची गुन्हे दाखल आहेत. तोच या टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. आठवड्यापूर्वीच सुशांत आणि सुनिल यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त केल्या होत्या. गुरूवारी त्यांचा तिसरा साथीदार गणेश मुंडे याला केजजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी १५ दुचाकी जप्त केल्या. आतापर्यंत एकूण ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सुशांतने पुण्यातच केला प्रेमविवाह
सुशांत आणि गणेश हे जिवलग मित्र. ते पुण्यातील एका कंपनीत काम करीत होते. येथेच त्यांची एका मुलीसोबत ओळख झाली. त्यांनी आळंदीत जाऊन विवाह केला. त्यानंतर ते सर्व सोबत रहात होते.
बायकोचे स्वप्न अधुरेच
सर्व दुचाकी विक्री करून आलेल्या पैशातून सुशांत बायकोसाठी एक व्हीआयपी कार घेणार होता. याच कारमधून तिला कंपनीत सोडण्याचे स्वप्न त्याने दाखविले होते. तसेच प्रत्येक विकएण्डला त्यांचे फिरायला जाण्याचे नियोजन होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे हे सर्व स्वप्न हवेत विरले.
आणखी गुन्हे उघड होतील
तीन दुचाकी चोरांकडून ३५ दुचाकी जप्त केल्या असून २४ गुन्हे उघड झाले आहेत. काही दुचाकींची ओळख पटविणे सुरू आहे. अजून गुन्हे उघड होऊ शकतात. तसेच या टोळीसोबत कनेक्ट असलेल्यांचा इतर गुन्हेगारांचाही शोध घेणे सुरू असून ते लवकरच सापडतील एलसीबीने चांगली कामगिरी केली.
- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड