चोरट्याने साडेचार लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरले, पोलिसांनी ते शोधून तक्रारदाराला परत केले
By सोमनाथ खताळ | Published: July 18, 2024 09:06 PM2024-07-18T21:06:12+5:302024-07-18T21:06:40+5:30
बीड शहर पोलिसांनी ही कामगिरी केली.
बीड: दोन महिन्यापूर्वी बंद घरी चोरी करून चोरट्याने साडे चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्कीट चोरी केले होते. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. शिवाय त्याच्याकडून सर्व मुद्देमाल परत मिळवत तो तक्रारदाराला बुधवारी सन्मानपूर्वक परत करण्यात आला. बीड शहर पोलिसांनी ही कामगिरी केली.
मोहम्मद शकीद्दीन खाजा मोईनुद्दीन यांचे शहरातील कागदी दरवाजा खासबाग परिसरात घर आहे. २१ मे २०२४ रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी डाव साधत घरातील कपाटात ठेवलेले साडेचार लाख रूपयांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या हात शोध लावून यातील आरोपी हा कागदी दरवाजा भागातीलच रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी सय्यद रिहान सय्यद अब्दुल रजाक याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील साडेचार लाखांची सोन्याचे बिस्कीट हस्तगत केली. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बुधवारी तक्रारदाराला ते सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड, पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुशील पवार, बालाजी मुळे आदींनी केली.