माजलगावात दुचाकी विक्री करताना चोरटा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:20+5:302021-07-17T04:26:20+5:30

माजलगाव : मागील दोन दिवसांपूर्वी धाब्यावरून चोरलेली दुचाकी विक्री करताना बाळू कोकरे (रा. टोकवाडी, ता. परळी) या चोरट्यास ...

The thief was caught while selling a bike in Majalgaon | माजलगावात दुचाकी विक्री करताना चोरटा पकडला

माजलगावात दुचाकी विक्री करताना चोरटा पकडला

Next

माजलगाव : मागील दोन दिवसांपूर्वी धाब्यावरून चोरलेली दुचाकी विक्री करताना बाळू कोकरे (रा. टोकवाडी, ता. परळी) या चोरट्यास नागरिकांनी येथील आंबेडकर चौकात रंगेहात पकडून बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. माजलगाव शहरात मागील वर्षभरापासून दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दर दिवसाला किमान एक दुचाकी भरदिवसा चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. चोरट्यांचा तपास लागत नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. पोलिसांत तक्रार देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी पोलिसांत तक्रार देणेही बंद केले होते. अनेक ठिकाणी तर चोरटे सीसीटीव्हीत कैद होऊनही सापडत नव्हते. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. दुसरीकडे नागरिक तर दुचाकी सांभाळण्यासाठी एकजण सोबत ठेवत होते.

आठ दिवसांपूर्वी दिंद्रुड पोलिसांनी मात्र एका टोळीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंधरा ते वीस दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यामुळे नागरिकांना आपल्या दुचाकी मिळतील अशी आशा निर्माण झाली होती. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शहराबाहेर गढी रोडवरील साई ढाब्यावर जेवण करण्यासाठी परमेश्वर पारेकर (रा. शिंदेवाडी) गेले होते. त्यांची दुचाकी (एम. एच. ४४ व्ही. ३१६९) अज्ञात चोरट्यांनी ढाब्यासमोरून चोरून नेली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आंबेडकर चौकात एक व्यक्ती ही दुचाकी विक्री करण्यास आल्याची माहिती पारेकर यांना मिळाल्याने ते चौकात गेले. तेथे बाळू कोकरे (रा. टोकवाडी, ता. परळी, ह. मु. मनुर, ता. माजलगाव) हा तरुण दुचाकी विक्रीचा सौदा करीत होता. त्यास पारेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ पकडून चोप दिला व शहर पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असून, या चौकशीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The thief was caught while selling a bike in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.