माजलगाव तालुक्यात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:51 PM2019-03-10T23:51:57+5:302019-03-10T23:52:19+5:30
माजलगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे. हे चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. शनिवारी रात्री पुन्हा तालुक्यातील नागडगाव येथे गावातील लाईट बंद करुन दोन घरे फोडली. यामध्ये रोख रकमेसह दागिने असा लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरापासून १५ किमीवर असलेल्या नागडगाव येथील माजी सरपंच किशोर रामदास सोळंके हे शनिवारी लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची आई एकटीच असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे गेट तोडून आत प्रवेश केला. सोळंके यांच्या आईवर दहशत निर्माण करीत त्यांना खोलीत कोंडले. त्यानंतर कपाटातील सोन्याचे गंठण, लॉकेट, अंगठी ३ व चांदीचे भांडे, चैन इ. वस्तू घेत पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी गावातीलच माणिक जातेगावकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. जातेगावकर हे सुद्धा लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. घराचे पत्रे उचकटून चोरटे घरात शिरले. कपाटात ठेवलेले रोख ७० हजार रूपये घेऊन ते पसार झाले. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी गावातील मुख्य विज पुरवठा खंडित केला होता. तसेच चोरी झालेल्यांच्या ठिकाणी शेजारील लोकांच्या घराला बाहेरून कड्या लावल्या.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी गावात धाव घेतली. ग्रामीण ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. तपास पोउपनि विकास दांडे हे करीत आहेत.