कोरोनातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:53+5:302021-05-01T04:32:53+5:30
बीड : मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वचजण हातबल झाले आहेत. दरम्यान, याचकाळात जिल्ह्यात चोरट्यांनी देखील धुमाकूळ घातला असून, मागील ...
बीड : मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वचजण हातबल झाले आहेत. दरम्यान, याचकाळात जिल्ह्यात चोरट्यांनी देखील धुमाकूळ घातला असून, मागील चार महिन्यांत जवळपास ३५० चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.
देशासह राज्यात मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट कायम आहे. या कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश उद्योग व्यावसाय बंद आहेत. त्यामुळे नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागात घरफोडी तसेच दुचाकीचोरी व मोबाईल चोरी या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे गुन्हे कमी होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात मात्र, गुन्ह्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना रोखण्यासाठी शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आलेले होते. त्यामुळे काही प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, चोरी व घरफोडीच्या, घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अनेक गुन्ह्यांची उखल करण्यात पोलीस प्रशासनाला यश देखील आले आहे.
चोरीच्या घटना
२०१९ - ६९०
२०२०- ६८६
एप्रिल २०२१ ३५०
बलात्कारही वाढले
जिल्ह्यात इतर काही गुन्हे कमी झाले असले तरी, २०१९ साली बलात्काराचे १०६ प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यात वाढ होऊन २०२० साली जवळपास १२९ बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत जवळपास ३२ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये अनेक घटनांचा तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे.
खुनाच्या घटनांमध्ये वाढ
कोरोनाकाळात विविध कारणांस्तव झालेल्या खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०१९ या वर्षात २४ तर, २०२० या वर्षात ५३ खून झाले होते. तर, एप्रिल अखेरपर्यंत जवळपास १९ खून झाल्याची माहिती आहे. यातील अनेक प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणली आहेत.
कोरोनाच्या काळात काही प्रमाणात गुन्हे कमी झाले असले तरी जिल्ह्यात दुचाकीचोरीचे प्रमाण वाढलेले आहे. काही टोळींचा बंदोबस्त केला आहे, सद्यस्थितीत पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण झालेला आहे. तरीदेखील आमचे पथक चोरट्यांच्या मागावर असून लवकरच अनेक घटना उघडकीस येतील. दरम्यान, नागरिकांनीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा.
-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.