चोरट्यांनी वाटमारी करून ९३ हजार रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:46+5:302021-05-16T04:32:46+5:30
केज : वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी लातूर जिल्ह्यातील बोरीमळा येथे जात असलेल्या कुटुंबीयांची कार तालुक्यातील सावंतवाडी फाट्याजवळ ...
केज : वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी लातूर जिल्ह्यातील बोरीमळा येथे जात असलेल्या कुटुंबीयांची कार तालुक्यातील सावंतवाडी फाट्याजवळ चार अज्ञात चोरट्यांनी अडविली. यावेळी चोरट्यांनी त्यांना धाक दाखवून नगदी २१ हजार रुपये, दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील बोरीमळा येथे वास्तव्यास असलेल्या वडिलांचे निधन १२ मे रोजी झाल्याने ठाणे येथे आरोग्य विभागात नोकरीस असलेले प्रदीप अशोक कांबळे हे वडिलांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे कुटुंब घेऊन स्वीफ्ट कारने (एम.एच.०२, ई.एच. १०६८) लातूरकडे निघाले होते. १४ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी (ता.केज) फाट्याच्याजवळ आली असता, चार चोरटे अचानक कारसमोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबले. चोरट्यांनी कारची चावी काढून घेत लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर चोरटे पसार झाले, प्रदीप कांबळे यांच्या फिर्यादीवरून चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत. नागरिकांनी प्रवास करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. तर, पोलीस प्रशासनानेदेखील गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.