दर वाढल्याने चोरट्यांचा मोर्चा इंधनाकडे; महिनाभरात उभ्या ट्रकमधून २७ लाखांचे डिझेल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:43 PM2022-04-16T18:43:42+5:302022-04-16T18:45:18+5:30
मालवाहू वाहने उभी करून मध्यरात्रीनंतर चालक विश्रांती घेतात. त्याचा फायदा घेत उभ्या वाहनांजवळ जीप उभी करून करायचे डीझेल चोरी
बीड: इंधन दराचा भडका उडाल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा डिझेल चोरीकडे वळविला आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी जालन्यातून पकडलेल्या मध्यप्रदेशच्या टोळीने महिनाभरात २७ लाख रुपयांचे डिझेल लंपास केल्याची माहिती आहे. जीपला बनावट क्रमांक असलेली पाटी लावायची, त्यात बसून जायचे अन पेट्रोलपंप, टोलनाक्यांवर उभ्या वाहनांतील डिझेल काढून धूम ठोकायची अशा पद्धतीने टोळीने बीडसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
नामलगाव फाटा येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या पाच वाहनांतील एक लाख रुपयांचे ११०० लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केल्याची बाब ८ फेब्रुवारी २०२२ रोजी उघडकीस आली. बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पाडळसिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जीपसह एक कार अशी तीन वाहने संशयास्पद आढळली. या क्ल्यूवरून पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सय्यद मुक्तार सय्यद करीम (४४, रा. लक्कडकोट, जालना), खेमचंद तुलसीराम जाटो (३४, रा. लक्ष्मीपूर, जि. साजापूर, मध्य प्रदेश), शौकत मजीद मेव (३६), अनिल कुमार बाबूलाल (३६), हाफिज कासम खॉ (२८), अशोक नजीर चावरे (३०, सर्व रा. दुपाडा, मोहर बडोपिया, जि. साजापूर, मध्य प्रदेश) व आवेश खान दादे खान (३२, रा. नाहदी कॉलनी, मिल्लत नगर, जालना) या सात जणांना उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या पथकाने जालना येथील चंदनझिरा परिसरातून अटक केली. त्यांनी एकूण आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून दोन जीप, एक दुचाकीसह डिझेल भरलेले व रिकामे कॅन असा सुमारे ६ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आधी रेकी अन् नंतर उघडायचे टाकी
मालवाहू वाहने उभी करून मध्यरात्रीनंतर चालक विश्रांती घेतात. त्याचा फायदा घेत उभ्या वाहनांजवळ जीप उभी करून रेकी करायचे, त्यानंतर टाकीचे कुलूप कटावणीने तोडून पाईपने इंधन काढून कॅनमधून भरायचे. कॅन जीपमध्ये टाकून आरामात निघून यायचे. चोरटे सोबत दगड व लोखंडी राॅडही ठेवत असत.
गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे शिवाय एक कार जप्त करणे बाकी आहे. या टोळीने बहुतांश गुन्हे पहाटे दोन ते चार या वेळेत केल्याचे उघड झाले आहे.
- संतोष साबळे , पोलीस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे