३ लाख ६७ हजारांच्या डिझेलवर चोरांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:13 PM2020-02-24T23:13:38+5:302020-02-24T23:14:47+5:30
येथील हरिनारायण आष्टा येथील पेट्रोल पंवावरील हौदाचे झाकण उघडून त्यातील ३ लाख ६७ हजार रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
आष्टी : येथील हरिनारायण आष्टा येथील पेट्रोल पंवावरील हौदाचे झाकण उघडून त्यातील ३ लाख ६७ हजार रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर-बीड रस्त्यानजिक अजिनाथ दगडू गळगटे यांच्या मालकीचा हरिनारायण आष्टा फाट्यावर जयकिसान पेट्रोल पंप आहे. २१ फेब्रुवारी रोजी ते पंपावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले. पंपावर त्यांच्यासोबत कामगार योगेश बाबासाहेब आंधळे हा होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गळगटे हे बाहेरील पलंगावर तर कामगार योगेश हे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता ते झोपेतून उठले व ते शेतात गेले. त्यानंतर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास योगेशने त्यांना फोन करून सांगितले की, पेट्रोलपंपावरील डिझेलच्या हौदातील टाक ीतून डिझेल चोरी गेले आहे. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत ही जवळपास ३ लाख ६७ हजार ४२० रुपये आहे. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत का, याचा शोध देखील पोलीस घेत आहेत.