तहानलेलं काळवीट विहिरात पडले, प्राणीमित्राने जीव धोक्यात घालून दिले जिवदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 04:36 PM2023-08-30T16:36:41+5:302023-08-30T16:37:16+5:30
आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड) : पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना काळवीट अचानक विहिरीत पडले. प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी माहिती मिळताच दोरीच्या सहाय्याने विहिरीत उरत जिवाची बाजी लावून काळवीटाला जिवदान दिले.
आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील साबळे वस्तीवर महादेव साबळे यांना मंगळवारी सायंकाळी शेताकडे जाताना एका विहिरीत काळवीट पडल्याचे दिसले. ही माहिती विनोद साबळेने कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना दिली. यावरून नितीन यांनी रात्री साडे नऊ वाजता दोरीच्या सहाय्याने विहिरीत जीव धोक्यात घालून उतरत काळवीटाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर वनरक्षक कल्पना विधाते यांच्या उपस्थितीत काळवीटाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.यावेळी अक्षय भंडारी, अमर कर्डीले, गणेश पवळ,राजू भोजने, प्रवीण कर्डीले,ओम शिंदे, सुमित जाधव,अक्षय गरूड, मनोज जाधव, विनोद साबळे, निखील साबळे, मनोज देसाई यांच्यासह नागरिकांनी मदत केली.
ऑगस्ट महिन्यात पाच वन्यजीवांला जिवदान!
वनात अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेताना पांगरा येथे बिबट्या तर सुलेमान देवळा येथे बिबट्याचा बछडा पडला होता तसेच शेरी येथे उदमांजर, साबलखेड येथे काळवीट, वाघाळूज येथे कोल्हा या वन्यजीवांना देखील जीवदान देण्यात प्राणीमित्र नितीन आळकुटेला यश आले आहे.