याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:59 PM2022-12-22T12:59:19+5:302022-12-22T13:00:49+5:30
मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व सरपंचपदाची निवडणूक झाली होती.
परळी (बीड) : तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंच म्हणून 635 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश मुंडे यांचा पराभव केला आहे. प्रकाश मुंडे हे सरपंच पदासाठी पराभूत झाले असले तरी त्यांच्या पत्नी गीता मुंडे या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले होते. सरपंचपद आणि एक जागा सोडता सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.
परळी तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सदस्यपदाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक- २ मधून अपक्ष उमेदवार गीता प्रकाश मुंडे या 20 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार दिव्या अंगद मुंडे यांचा पराभव केला. गीता प्रकाश मुंडे यांना 229 मते मिळाली तर दिव्या अंगद मुंडे यांना 209 मते मिळाली आहेत. गीता प्रकाश मुंडे या अपक्ष तर दिव्या अंगद मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांच्या उमेदवार होत्या. तर अपक्ष गीता मुंडे यांचे पती प्रकाश मुंडे हे सरपंचपदासाठी मुंडे बहिण-भाऊ यांचे चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विरोधात उभे होते. प्रकाश मुंडे यांना सरपंच पदासाठी 214 मते मिळाली, तर अभय मुंडे यांना 849 मते मिळाली आहेत. अभय मुंडे हे सरपंच पदी निवडून आले. सरपंच पदाचे उमेदवार गौतम आदमाने यांना 189, रमेश मुंडे यांना 28 तर नोटाला 9 मते मिळाली. नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व सरपंचपदाची निवडणूक झाली होती.
बेरोजगारांसाठी लढवली निवडणूक
नाथरा गावातील 100 बेरोजगार असून त्या पैकी 20 बेरोजगाराना रोजगार मिळावा ही आपली मागणी होती. विरोधासाठी विरोध म्हणून निवडणूक लढविली नाही. तर बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपण सरपंच पदाची व पत्नीने सदस्यपदाची निवडणूक लढविली. आपला पराभव झाला पण पत्नीच्या विजयाचा आनंद आहे.
- प्रकाश मुंडे, अपक्ष उमेदवार, नाथरा