यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:07 PM2023-09-12T12:07:58+5:302023-09-12T12:08:41+5:30
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईतर्फे दरवर्षी दिला जातो पुरस्कार
अंबाजोगाई - यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यावर्षीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव ( कळंब ) यांना जाहीर झाल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली. प्रा. चंदनशिव हे ग्रामीण कथा, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण लिखाणासाठी ख्यातनाम आहेत.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्यावतीने स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी साहित्य, संगीत, पत्रकारिता, सुसंस्कृत राजकारणी, क्रीडा, सिनेमा - नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून यावर्षी प्रा. भास्कर चंदनशिव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी ( दि. १७ ) सकाळी ११ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई येथे होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे व मार्गदर्शक भगवानराव शिंदे आणि राजपाल लोमटे यांनी केले आहे.
प्रा. चंदनशिव यांचा परिचय
प्रा. भास्कर चंदनशिव यांचे शिक्षण व जडणघडण अंबाजोगाई येथेच झाली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर, बीड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले. त्याच बरोबर त्यांनी मराठी साहित्यात ग्रामीण कथा, कांदबरी, ललित असे वैविध्यपूर्ण लिखाण करून ग्रामीण साहित्यात नवा आयाम दिला आहे. त्यांच्या अनेक कथा व कांदबरी महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. त्यांची लाल चिखल ही कथा अनेक रूपाने वाचक व साहित्याचे अभ्यासक यांच्या मनात कायम कोरली गेली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक नामांकित पुरस्कार, त्याच बरोबर साहित्य संस्थांचे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या साहित्य सेवेची दखल घेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे.
यापूर्वीचे पुरस्कार प्राप्त मान्यवर
यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हास दादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे व पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.