यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:51 PM2022-09-03T12:51:07+5:302022-09-03T12:51:57+5:30

ब्रिटन, रशिया,पश्चिम जर्मनी, अमेरिका आदी देशातील अभ्यासक, संशोधकांनी त्यांच्या साहित्यावर प्रबंध सादर केले आहेत.

This years Bhagwanrao Lomte Memorial State Award Announced to Padmashri Dr. Y. M. Pathan | यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांना जाहीर

यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांना जाहीर

googlenewsNext

अंबाजोगाई -  यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी संत साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, व लेखक पद्मश्री डॉ. यू. म. पठाण औरंगाबाद यांना घोषित केला आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.

डॉ.यू. म. पठाण हे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दयानंद महाविद्यालय, सोलापूर, येथे अध्यापनाचे केले आहे. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्रपाठक, अधिव्याख्याता व विभागप्रमुख म्हणूनही काम केले आहे. भारतातील व जगातील अनेक विद्यापीठात त्यांनी संत साहित्यावर हजारो व्याख्याने दिली आहेत. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आणि विद्यावाचस्पती ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. त्यांना अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बिर्ला फाऊंडेशन, साहित्य अकादमी, राष्ट्रपती पुरस्कार, अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, आचार्य अत्रे, निर्मलकुमार फडकुले, मोहिते पाटील, विखे पाटील, कुसुमताई चव्हाण, याच बरोबर  त्यांच्या संत साहित्य -  चिंतन ला मसाप पुरस्कार, बहेणी म्हणे ला स्वामी स्वरूपानंद पुरस्कार, नंदादीप ला महानुभाव विश्वभारती पुरस्कार, श्रोगोंदाचा जीवन गौरव पुरस्कार, काही आयाम ला डॉ. प्र. न. जोशी असे मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडे त्यांना अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. 

त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यात मराठी कवियत्रींचे साहित्य, शिवप्रभुंचे  चरित्र, भाऊसाहेबांची बखर, लिळा चरित्र :एकांक, दृष्ठांतपाठ, स्मृतीस्थळे  हे ग्रंथ आहेत. त्यांची ललित लेखनाची सात, दोन कथा संग्रह, दोन व्यक्तिचित्रे, निबंध व कोश असे चार ग्रंथ  प्रसिद्ध आहेत. ६३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, १६ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, पहिल्या राष्ट्रसंत विश्वधर्म संतसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यासह ते अनेक वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत.  साहित्य संस्कृती मंडळ, परिनिरीक्षण मंडळ, विश्वकोश संपादक मंडळ, भाषा सल्लागार मंडळ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार समिती अशा अनेक मंडळाचे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. ब्रिटन, रशिया,पश्चिम जर्मनी, अमेरिका आदी देशातील अभ्यासक, संशोधकांनी त्यांच्या साहित्यावर प्रबंध सादर केले आहेत.

भगवानराव लोमटे व डॉ. पठाण यांची चांगली मैत्री होती. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते व त्यांना समितीचा यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कारही देण्यात आला होता.  या कार्याची दखल घेवून यावर्षीचा दहावा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. यापूर्वी हे पुरस्कार यशवंतराव गडाख, विजय कुवळेकर, ना. धो. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, प्राचार्य रा. रं. बोराडे व उल्हासदादा पवार  यांना प्रदान केला गेला आहे. १९ सप्टेंबर २०२२ सोमवार रोजी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित केला जाईल अशीही माहिती दगडू लोमटे यांनी दिली आहे.

Web Title: This years Bhagwanrao Lomte Memorial State Award Announced to Padmashri Dr. Y. M. Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.