परळी तहसीलवर मराठा आरक्षणासाठी धडकला ठोक मोर्चा; आंदोलन अद्याप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:16 PM2018-07-18T16:16:51+5:302018-07-18T16:19:02+5:30
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
परळी (बीड ) : आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, मेगा भर्ती रद्द झालीच पाहिजे, कर्ज माफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह इतर घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज दुपारी परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा धडकला. त्यानंतर सायंकाळपर्यंत परळी तहसील कार्यालया समोर मोर्चेकरणांनी ठिय्या आंदोलन केले. या ठोक मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहाभागी झाला होता. परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, परळीचे तहसीलदार शरद झाडके यांनी मोर्चकरांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. पोलीस बंदोबस्त तगडा होता.
मराठाला समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, धान्याला हमीभाव द्यावा, शासनाची मेगा भरती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शिवाजी चौकात बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ठोक मोर्चासाठी मराठा समाजातील युवक जमण्यास सुरूवात झाली. 12.30 वाजता शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून व अभिवादन करून मोर्चास सुरूवात झाली. मोर्चातील गगणभेदी घोषनेने परिसर दणानूण गेला.
एक मराठा लाख मराठा, जय भवानी-जय जिजाऊ, जय जिजाऊ-जय शिवराय अशाही घोषणा मोर्चकरी देत होते. हा मोर्चा शिवाजी चौकातून आझाद चौक, वैद्यनाथ महाविद्यालय रोड मार्ग परळी तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील, महेश डोंगरे, संजय सावंत, स्वाती नखाते, नानासाहेब जावळे, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, पुजा सोळंके, अमीत घाडगे, अन्नपुर्णा जाधव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी आपल्या भाषणातून करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व शासना कडाडून टिका केली.
यावेळी मोर्चेकरांसाठी वाहेद खान पठाण, उपगराध्यक्ष अय्युब पठाण व मित्र परिवाराने पिण्याच्या पाण्याची सोय केली. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता, शांततेत हा मोर्चा निघाला गणिमी काव्याने मोर्चा काढण्याचा ईशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला होतो. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पंढरपुर येथे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात येईल व पंढरपुर येथे मोठ्या संख्येने एकजुटीने सहभागी होण्याचे अवाहन आबासाहेब पाटील (पुणे) यांनी केले आहे.
आंदोलन अद्याप सुरु
जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा परळीतील मोर्चेकऱ्यांनी दुपारच्या सुमारास केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरी आपली जागा सोडणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली