ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचेच साहित्य दर्जेदार - रंगनाथ तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:55 AM2017-12-25T00:55:29+5:302017-12-25T01:04:44+5:30

Those who have sattva, they are the only good quality - Ranganath Tiwari | ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचेच साहित्य दर्जेदार - रंगनाथ तिवारी

ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचेच साहित्य दर्जेदार - रंगनाथ तिवारी

Next
ठळक मुद्देमराठवाडा साहित्य संमेलनाला प्रारंभ

सतीश जोशी
अंबाजोगाई (जि. बीड) : आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत. ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचे साहित्य दर्जेदार; परंतु अपवाद सोडला तर दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही. पुरस्कारासाठी स्वाभिमान विसरून साहित्यिक लीन होताना दिसत आहेत आणि दर्जा नसलेल्या साहित्यास पुरस्कार मिळावा म्हणून राजकारण्यांच्या समोर रांगेत तिष्ठत बसतात, हे चित्र शोचनीय आहे, अशा शब्दांत मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांनी खंत व्यक्त केली.

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या वतीने अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय परिसरात रविवारी सकाळी मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ झाला. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणाने केली. गोपीनाथ आणि प्रमोद महाजन हे माझे विद्यार्थी.

राज्यात असो की केंद्रात, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविलेले असे किती तरी जण माझे विद्यार्थी होते. हेच विद्यार्थी माझ्या जगण्याचा आधार होते. त्यांच्या आठवणींचा विस्तार वर्तमानातून भूतकाळात मानवी जीवनात घेऊन जातो. आम्ही मास्तर होतो; पण कर्तव्यापासून दूर राहिलो नाहीत, कुणापुढे मान तुकवली नाही, लाचार झालो नाहीत. देवाच्या कृपेने असे विद्यार्थी मिळाले, असे सांगताना त्यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रहार केले. गुणवत्ता असूनही नोकºया मिळत नाहीत, दहा लाखांपासून ते वीस लाखांपर्यंत नोकरीसाठी पैसे मागितले जातात. नाइलाजाने देणारेही देतात आणि घेणारेही निर्लज्जपणे घेतात, ही शोकांतिका आहे. वंचितांच्या मदतीला कुठलाही विठ्ठल धावून येत नाही. जगावे कसे, असा प्रश्न निर्माण होतो. सत्ता आणि संपत्ती वेश्येच्या पलीकडे गेलेली साधना बनत आहे. व्यभिचार करणारे राजकारणी वाढत आहेत. स्वाभिमान जपणाºयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संत साहित्याने महाराष्ट्राला भरपूर काही योगदान दिले आहे. दासोपंतांची पासोडी, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांंना जगाच्या पाठीवर तोड नाही. जगण्याचा सार यात आहे; परंतु आजच्या काळात संतांपेक्षा मोठा साहित्यिक जन्माला आला नाही. अपवाद सोडला तर साहित्याचा दर्जा घसरत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी भाषा आणि शब्दप्रयोग केले जातात. अशा शब्दांचा जिल्हानिहाय आठ शब्दकोष निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एक लेखणी, पुस्तक, शिक्षक जगाला बदलू शकतो. गुरू हा ईश्वरापर्यंत माणसाला घेऊन जातो. कसे जगावे, हे शिकवत असतो. गुरूमुळेच आपणास समाजात मान-सन्मान मिळतो; परंतु आजच्या या युगात शिक्षकाला त्याच्या कर्तव्यापासून दूर नेत दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या समारंभात उत्कृष्ट कार्य करणाºया वडवणी तालुक्यातील देठेवाडी येथील राजेंद्र गायकवाड या आदर्श शिक्षकाचा सपत्नीक दोघांंनाही अंगठ्या व आहेर देऊन सत्कार केला. हा धागा पकडून ते म्हणाले की, हा प्रसंग आपणा सर्वांसाठी सुखद अनुभव आहे. नाही तर शिक्षकांंना अंगठ्या देऊन सन्मानित करण्यापेक्षा त्यांनाच लुबाडण्याचा नवा धंदा शिक्षण क्षेत्रात रूढ होत असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषण मलाला युसूफजईला अर्पण
तिवारी म्हणाले, माझे हे अध्यक्षीय भाषण पाकिस्तानच्या मलाला युसूफजई या मुलीला अर्पण केले आहे. आतंकवादाला जिंकण्याची आत्मशक्ती कशी असली पाहिजे, हे तिने जगाला दाखवून दिले आहे. मिळालेले नोबेल पारितोषिकही शिक्षणापासून वंचित मुलांना तिने अर्पण केले. प्रचंड विरोध असतानाही तिने या वंचित मुलांंना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता.

साहित्याच्या व्यासपीठावरून राजकीय विषयांचा उहापोह
उद्घाटनाच्या सत्रात पंकजा मुंडे-पालवे, सुरेश धस, खा. रजनी पाटील यांनी आपल्या भाषणात साहित्य व संस्कृती या विषयाचा धागा शेवटपर्यंत सोडला नाही; परंतु मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाचे यजमान असणाºया कौतिकराव ठाले पाटलांनी मात्र साहित्याच्या व्यासपीठावरून राजकीय विषयाचा उहापोह केला. पंकजा यांनी आपल्या भाषणात यावर कोपरखळीही मारली. ठाले पाटलांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा गैरफायदा घेतला जात आहे. अनिर्बंध लेखनावर त्यांनी टीका केली. नाट्यलेखक, चित्रपट दिग्दर्शक अप्रामाणिक बनले असून, वादग्रस्त विषय हाताळताना इतिहासाची मोडतोड करीत आहेत. त्यांची गल्ल्यावर नजर आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Those who have sattva, they are the only good quality - Ranganath Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.