मुंडे समर्थकांची मांदियाळी; समाधीस्थळाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:58 AM2019-12-13T03:58:29+5:302019-12-13T04:00:55+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मेळाव्याला उपस्थिती

Thousands of activists were crowded since morning to appearance the tomb of Gopinath Munde | मुंडे समर्थकांची मांदियाळी; समाधीस्थळाचे घेतले दर्शन

मुंडे समर्थकांची मांदियाळी; समाधीस्थळाचे घेतले दर्शन

googlenewsNext

बीड : पांगरी येथील गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.

पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अमर रहे घोषणा दिल्या. चंद्रकांत पाटील यांचा व्यासपीठावर उल्लेख होताच काही कार्यकर्त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंकजा यांनी माईक हाती घेऊन त्यांना शांत केले. एकनाथ खडसे यांच्या भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या मिळाल्या.

आमची नियत साफ : जानकर

आम्ही मुंडे साहेबांपासून सोबत आहोत. महायुतीतीलही घटक पक्ष आहोत. आमची नियत साफ आहे. बारामतीची पालखी वाहणारे आम्ही नाहीत, असे जानकर म्हणाले. मुंडे साहेबांप्रमाणेच पंकजा यांच्या पाठीशीही आम्ही भक्कमपणे उभे आहोत. पक्षाकडून त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. तुम्ही लक्ष द्या, असे आवाहन जानकर यांनी चंद्रकांत पाटील यांना केले.

मला गृहीत धरू नका - एकनाथ खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाषणाचा सूर सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्यांनी पक्षश्रेष्ठींवर घणाघात केला. खडसे म्हणाले, एकेकाळी भाजपमध्ये गोपीनाथराव मुंडे यांना अपमानास्पद वागणूक दिली तोच प्रकार आज माझ्याबाबतीत घडत आहे. गोपीनाथरावांनी आणीबाणीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत भाजपची ओळख सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून करुन दिली.

कार्यकर्ता, नेते घडविले. कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मुंडे यांनी आयुष्यभर पक्षासाठी संघर्ष केला. परंतु त्यांच्या वाट्यालाही पक्षात दु:खच आले. आज माझ्याबाबतीत घडत आहे. आजचे भाजपमधील चित्र महाराष्ट्राला मान्य नाही. गोडगोड बोलून पाडायचे, ही नीती राबवली जात आहे. माझ्याप्रमाणेच पंकजा यांनाही परळीत हा अनुभव आला.

कार्यकर्ता, नेते घडविले. कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मुंडे यांनी आयुष्यभर पक्षासाठी संघर्ष केला. परंतु त्यांच्या वाट्यालाही पक्षात दु:खच आले. आज माझ्याबाबतीत घडत आहे. आजचे भाजपमधील चित्र महाराष्ट्राला मान्य नाही. गोडगोड बोलून पाडायचे, ही नीती राबवली जात आहे. माझ्याप्रमाणेच पंकजा यांनाही परळीत हा अनुभव आला. आपल्याच माणसांनी पाडण्याचे पाप केले.

किती दिवस सहन करणार? पंकजा भाजप सोडणार नाहीत परंतु माझा मात्र भरोसा धरू नका. ४० वर्षे पक्षात काम करणारे आज का गुदमरत आहेत? पक्ष सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मुंडे साहेबांनी मोठ्या मनाने माणसे घडविली. आज तसे घडत नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.

चुका माणसाकडून झाल्या, पक्षावर राग कशासाठी? - चंद्रकांत पाटील

व्यथा, दु:ख व्यक्त झाले पाहिजे. त्याची दखलही घेतली पाहिजे. चुका माणसाकडून झाल्या, त्याचा पक्षावर राग कशासाठी? बोलण्यातून एकमेकांना जखमा करू नका. घरातले भांडण घरातच मिटले पाहिजे, ते रस्त्यावर यायला नको, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराज नेत्यांची समजूत घातली.

नाराजांचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने होता. खडसे यांनी तर अपमानास्पद वागुणकीबद्दल श्रेष्ठींवरही टीका केली होती. या भाषणाचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, पक्ष कुठलाही असो थोडीफार नाराजी, तक्रारी असतातच. त्या व्यक्तही झाल्या पाहिजेत. या चुका व्यक्तींच्या असतात, पक्षाच्या नसतात. तेव्हा व्यथा मांडताना देखील शब्द जपून वापरले पाहिजेत. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर आपण जे काही बोललो असतो, त्याचाच आपणास पश्चाताप होईल. बदल हा होतच असतो. त्यात नवीन पक्षाची भाषा कशाला?
यावेळी बबनराव लोणीकर, हरिभाऊ बागडे यांचेही भाषण झाले.

Web Title: Thousands of activists were crowded since morning to appearance the tomb of Gopinath Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.