माजलगावात मुलींच्या जन्मदरात हजारामागे तब्बल १५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:47 AM2020-02-23T03:47:26+5:302020-02-23T06:52:40+5:30
अवैध गर्भपात झाले कमी; बीड जिल्ह्यात ‘माजलगाव पॅटर्न’ने जनजागृतीला नवी दिशा
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) : मुलींच्या जन्मदराबाबत मागे असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मागील ४-५ वर्षांमध्ये मुलींच्या जन्मदरात समाधानकारक वाढ होत आहे. मागील आठ महिन्यांत १ हजार मुलांमागे ९६७ मुली असा जन्मदर रहिला आहे. ५ वर्षांपूर्वी तो हजाराला ८५० पेक्षा कमी होता. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली आहे. बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताची प्रकरणे उघडकीस आली होती.
एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांतर्गत १ जून २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत १ हजार ९७७ महिलांच्या प्रसूती झाल्या. त्यात १ हजार १३ मुले जन्माला आली तर ९६४ मुलींचा जन्म झाला. सप्टेंबर २०१९ मध्ये १३२ मुले तर १३८ मुलींचा जन्म झाला. हा जन्मदर १ हजार मुलांच्या तुलनेत १ हजार १४५ एवढा होता. आठ महिन्यांत तीन महिने मुलींचा जन्मदर एक हजारांपेक्षाही जास्त होता. त्यात जुलै, आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१९ मध्ये मुलींचा जन्मदर हजारी केवळ ७५४ होता त्यानंतर सर्व महिन्यांत ८७७ पेक्षा जास्त मुलींचा जन्मदर आहे. मागील आठ महिन्यांत हजारामागे ९६७ एवढी सरासरी निघत आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून आमच्या कार्यालयामार्फत प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ बाबत वारंवार विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती केली. याचा परिणाम मुलींच्या वाढलेल्या जन्मदरावरून दिसून येत आहे.
- आर. एस. बुडुख, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, माजलगाव