बीड कारागृहात वाल्मीक कराडपासून माझ्या पतीला धोका; धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:24 IST2025-03-24T12:23:58+5:302025-03-24T12:24:50+5:30
बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्यात दादासाहेब खिंडकरसह सात जणांविरोधात अपहरण करून तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.

बीड कारागृहात वाल्मीक कराडपासून माझ्या पतीला धोका; धनंजय देशमुखांच्या साडूच्या पत्नीचे पत्र
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे सध्या एकाच कारागृहात आहेत. तेथे माझ्या पतीला कराडपासून धोका असल्याचे पत्र खिंडकर याची पत्नी अश्विनी खिंडकर यांनी बीडच्या कारागृह अधीक्षकांना दिले आहे. त्यानंतर खिंडकर याला दुसऱ्या बरॅकमध्ये हलविण्यात आले आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्यात दादासाहेब खिंडकरसह सात जणांविरोधात अपहरण करून तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिस कोठडी झाल्यानंतर खिंडकर याला न्यायालयीन कोठडी झाली. तो सध्या बीडच्या कारागृहात आहे. तो बरॅक क्रमांक २ मध्ये असल्याचे पत्नी अश्विनी खिंडकर यांनी सांगितले. याच ठिकाणी वाल्मीक कराड असल्याने माझ्या पतीच्या जिवाला धोका असल्याची भीती अश्विनी यांनी व्यक्त केली. पतीला इतर ठिकाणी हलवावे, तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही त्यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
सर्व आरोपी हे वेगवेगळ्या बरॅकमध्ये आहेत. खिंडकरला भीती वाटत असल्याने तीन क्रमांकाच्या बरॅकमध्ये हलविले आहे. वाल्मीक कराड हा नऊ क्रमांकाच्या बरॅकमध्ये आहे.
- बक्सर मुलाणी, कारागृह अधीक्षक, बीड