साडेतीन कोटींच्या बक्षिसाच्या आमिषाने परळीच्या युवकाला तीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:18 AM2019-01-16T00:18:49+5:302019-01-16T00:19:42+5:30
‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून ती रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगत युवकाला २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून ती रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगत युवकाला २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परळी शहरातील थर्मल कॉलनीत राहणारा १९ वर्षीय युवक गणेश (नाव बदललेले) याला ‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागले असल्याचा संदेश २१ डिसेंबर रोजी मिळाला होता. त्याला भुलून गणेशने संदेशमध्ये देण्यात आलेल्या मेल आयडीवर स्वत:चा पत्ता, फोन क्रमांक, व्यवसाय याबद्दलची माहिती पाठविली. त्यांनतर २४ डिसेंबर रोजी सिमेन पॉल नावाचा व्यक्ती तुमची रक्कम आणि बक्षीस घेऊन नवी दिल्ली येथे आला असून त्याचा कस्टम चार्ज म्हणून २४ हजार ५०० रुपये संदीप सिंग नामक व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार गणेशने सदरील रक्कम त्यांच्याकडे जमा केली. त्यानंतर बक्षिसाची रक्कम गणेशच्या खात्यावर जमा होत असल्याचे भासविण्यात आले. ५५ टक्के रक्कम खात्यावर जमा झाल्याचे दर्शवून ‘कन्फर्म कोड’च्या नावाखाली अनिकेत कडून दीड लाख रुपये जमा करून घेण्यात आले. त्यांनतर ७५ टक्के रक्कम जमा झाल्याचे भासवून उर्वरित रकमेसाठी टॅक्स चार्जच्या बहाण्याने २ लाख २८ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यापैकी १ लाख १४ हजार रुपये गणेशने कृष्णा आणि मानसी या दोन व्यक्तींच्या खात्यावर टाकले. परंतु, संशय आल्याने अनिकेतने काही लोकांशी याबाबत चर्चा केली आणि आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर गणेशने संभाजीनगर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. अनिकेतच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संभाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.