रस्त्यात अडवून दाम्पत्याला मारहाण, विवाहितेवर अत्याचार प्रकरणात २० तासांत तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 07:57 PM2024-01-19T19:57:06+5:302024-01-19T19:57:30+5:30
एक तरुण आणि दोन अल्पवयीन मुले अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत
- नितीन कांबळे
कडा- गुरूवारी अहमदनगर येथे दवाखान्यात गेलेले जोडपे रात्री उशिरा गावाकडे येत असताना रस्त्यात थांबले असता तीन जणांनी मारहाण करत एकाने महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना घडली.या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपीस एका २० वर्षीय अश्या तिघाजणांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
गुरूवारी रात्री अहमदनगरवरून नांदुर विठ्ठलाचे मार्गे एक दाम्पत्य सोलापूरवाडीकडे दुचाकीवरून जात होते. नांदुर फाट्याच्या पुढे दुचाकीवरील ( क्र एम.एच २३,बी.एफ.७०५१ ) तिघांनी त्यांना अडवत उलटसुलट प्रश्न विचारू लागले. तसेच पुरूषास लाकडी काठीने व लाथाबुक्याने मारहाण केली. महिलेस बाजूला नेत एकाने अत्याचार केला. दरम्यान, रात्रगस्तीवर असलेले सपोनि महादेव ढाकणे सहकारी पोलिस शिपाई शिवदास केदार, बाळासाहेब जगदाळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहून तिघेही दाम्पत्याचे दोन मोबाईल, दहा हजार रूपये रोख बळजबरीने घेऊन पसार झाले. यावेळी पोलिसांना आरोपींची मोटारसायकल जागेवर आढळून आली. सपोनि महादेव ढाकणे यांनी जखमी दाम्पत्यास औषधोपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.
तिन्ही आरोपी एकाच गावचे
दरम्यान, अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या मोटारसायकल क्रमांकावरून आरोपींचा शोध घेतला.अधिक तपास करत पोलिसांनी नांदुर विठ्ठलाचे येथून सौरभ ज्ञानदेव गायकवाड ( २०) आणि दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या २० तासांत अटक केली. याप्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी व बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यांना मोटार सायकल सह ताब्यात घेतले.पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, सहायक फौजदार रोकडे, पोलिस हवालदार मनोज खंडागळे, महिला पोलीस नाईक सुवर्णा पालवे, पोलिस शिपाई शिवदास केदार, सुदाम पोकळे, सतीश पैठणे, बाळू जगदाळे यांनी केली.