महिलेच्या चौथ्या प्रसुतीत समजलं पोटात तिळे; एकाचा मृत्यू, जुळे वाचले, माताही सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:38 PM2024-06-18T15:38:36+5:302024-06-18T16:02:22+5:30
बीड जिल्हा रूग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; जुळे आणि माता यांच्यावर उपचार सुरू
- सोमनाथ खताळ
बीड : वजन केवळ ४० किलो. वयही ३५. अशा अवस्थेत चौथ्यांदा गर्भवती. त्रास होत असल्याने सोनोग्राफी केली तर तिळे मुले दिसली. त्यातील एक बाळ आगोदरच मृत होते. या महिलेला तातडीने शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. तासभर चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेची सुखरूप प्रसुती झाली. तिचे दाेन जुळे मुले सुखरूप असून एसएनसीयूमध्ये उपचार घेत आहेत. सध्या माता व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
बीड तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेची परिस्थिती साधारण आहे. तिच्या अगोदर तीन प्रसुती झाल्या होत्या. सध्या ती चौथ्यांदा गर्भवती होती. पाचवा महिना चालू असतानाच रक्त कमी असल्याने ती जिल्हा रुग्णालयात ॲडमिट झाली. तिला पाच बॅक रक्ताच्या चढविल्यावर तिचे एचबी आठपर्यंत गेले. त्यामुळे तिला रुग्णालयातून सुटी दिली. त्यानंतर सोमवारी तिला त्रास जाणवू लागल्याने ती पुन्हा आली. यावेळी तिची सोनोग्राफी करण्यात आली. यामध्ये तिळे मुले असल्याचे समजले. त्यातील एक बाळ तर साधारण चार दिवसांपूर्वीच पोटात मयत झाल्याचे समजले. त्यामुळे या महिलेला तातडीने शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व त्यांची टीम आगोदरच एक शस्त्रक्रिया करत होती. महिलेची प्रकृती पाहून तिला सीझरसाठी घेण्यात आले. अतिशय गुंतागुतीची असलेली शस्त्रक्रिया करून अगोदर मयत बाळ बाहेर काढले. त्यानंतर दोन जिवंत बाळे बाहेर काढली. हे दोन्हीही मुले असून त्यांचे वजन १३०० ग्रॅमपर्यंत आहे. सध्या या दोघांवरही एसएनसीयूमध्ये तर मातेवर सीझर वॉर्डमध्ये उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
सरकारीतही तत्पर सेवा
सरकारी रूग्णालयात सेवा मिळत नाहीत, अशी ओरड असते. परंतु अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करून हा आरोप डॉक्टरांनी खोडून काढला आहे. रूग्णसंख्या वाढल्याने सुविधा जरी कमी असल्या तरी सेवा देण्यात आम्ही कुठेही कमी नसतो, असा विश्वास जिल्हा रूग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे यांच्यासह सर्व टीम सेवेसाठी परिश्रम घेत असल्याचे सांगण्यात आले.
सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर
संबंधित महिलेची सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटात तीन बाळे असून त्यातील एक अगोदरच मृत झाल्याचे समजले. त्यामुळे तातडीने तिला शस्त्रक्रिया गृहात घेऊन सिझर केले. आगोदर मृत बाळ बाजूला केले. त्यानंतर तिचे जुळे मुले जिवंत जन्माला आले. मुलांवर एसएनसीयूमध्ये तर मातेवर सीझर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतु तरीही त्यांना निगराणीत ठेवले आहे. हा दुर्मीळ योग म्हणावा लागेल.
- डॉ.नागेश चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बीड