फसवणूकप्रकरणी नायब तहसीलदारासह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:03 AM2019-11-11T00:03:05+5:302019-11-11T00:03:24+5:30
बनावट कागदपत्राच्या माध्यमातून बोगस शिधापत्रिका तयार करुन त्याचा वापर न्यायालयातील जामिनासाठी पुरावा म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बीड : बनावट कागदपत्राच्या माध्यमातून बोगस शिधापत्रिका तयार करुन त्याचा वापर न्यायालयातील जामिनासाठी पुरावा म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी शनिवारी (दि.९) रात्री निवृत्त नायब तहसीलदारासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
निवृत्त नायब तहसीलदार बन्सीधर घोडके, लिपीक विनोद दोडके व गुलदाद खान गफ्फार खान पठाण यांच्यावर बोगस शिधापत्रिकेप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बबन विठोबा काळे व लड्डा यांच्या नावाने कुठल्याही प्रकारचा अर्ज नसताना त्यांच्या नावे शिधापत्रिका तयार करुन घेण्यात आल्या होत्या. बबन काळे यांना १४ जुलै २०१७ रोजी शिधापत्रिका दिल्याची तर १४ मार्च २०१७ रोजी लड्डा यांना शिधापत्रिका दिल्याची नोंद बीड येथील तहसील कार्यालात करण्यात आलेली आहे.
या शिधापत्रिकांचा मुंबई व इतर ठिकाणी न्यायालयात जामिन घेण्यासाठी पुरावा म्हणून वापर केला जात होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासन व न्यायालयाची फसवणूक केली म्हणून काझी लतीफोद्दीन यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून या तिघांविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तापस पोउपनि गोडसे हे करत आहेत.