तीन बालकांची कोरोनावर यशस्वी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:22+5:302021-05-14T04:33:22+5:30
आजीसोबत रमले कोविड सेंटरवर अनिल महाजन धारूर : धारूर येथील पुजदेकर कुटुंबातील आजी व तिच्या तीन नातवांना कोरोनाने ...
आजीसोबत रमले कोविड सेंटरवर
अनिल महाजन
धारूर : धारूर येथील पुजदेकर कुटुंबातील आजी व तिच्या तीन नातवांना कोरोनाने घेरले, पण आजीची प्रबळ इच्छाशक्ती आणि नातवांच्या धाडसामुळे सर्वांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. कोरानामुक्त होऊन घरी परतल्यानंतर पुष्पवृष्टी आणि औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाशी लढणाऱ्या या बालकांचे कौतुक होत आहे.
शहरातील कजबा विभागातील शाम पुजदेकर यांची आई आजारी पडल्याने त्यांची कोरोना चाचणी केली. त्या पॉझिटिव्ह निघाल्याने घरातील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. शाम पुजदेकर व त्यांच्या पत्नीचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला. मात्र घरातील दोन लहान मुली व एक मुलगा यांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. सुमित शाम पुजदेकर (वय ५), आदिती पुजदेकर (७) आणि सोनू पुजदेकर(९) यांचा यात समावेश होता. त्यामुळे या कुटुंबात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर धारूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारांसाठी दाखल केले. या बालकांनी कोविड केअर सेंटरमधील डाॕॅक्टर व कर्मचाऱ्यांना चांगला प्रतिसाद देत उपचार घेतले. या ठिकाणी व्यवस्थित राहून या तीनही बालकांनी कोरोनावर मात केली. जिद्दीने या सर्व बालकांनी आजीसह येथे राहून कोरोनावर यशस्वी मात केली. घरी परतलेल्या आजीसह बालकांचे औक्षण करण्यात आले.
सुमित, आदिती, सोनू तिघेही कसलीही भीती न बाळगता कोविड केअर सेंटरवर थांबून उपचार घेतले. आठ दिवसात कधीही घरी येण्यासाठी ते मागे लागले नाहीत. गुरुवारी सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने कोविड सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले
- शाम पुजदेकर, पालक
आईकडे जायचे म्हणताच बोट पुढे
कोविड सेंटरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या बालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आईकडे जायचे ना, असे विचारताच सुमित चटकन बोट पुढे करून ऑक्सिमीटर लावण्यास प्रतिसाद द्यायचा. औषध, गोळ्या वेळच्या वेळी घेतल्याने ही मुले लवकर कोरोनामुक्त झाली. त्यांना निरोप देताना आनंद होता, पण बच्चे कंपनीचा सहवास मिळणार नसल्याने करमतही नव्हते.
- डॉ. शफिक तांबोळी, वैद्यकीय अधिकारी
------
धारूर येथील कोविड केअर सेंटरवर आतापर्यंत शून्य ते १० वर्षे वयोगटातील ३६ बालके उपचारांसाठी दाखल झाली. यात चार महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता.
----------
===Photopath===
130521\fb_img_1620892965324_14.jpg