दुसरा डोस घेतल्यावरही तिघे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:06+5:302021-03-16T04:33:06+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या काही दिवसांत जिल्हा राज्यात अव्वल राहिला; परंतु नंतर सर्वांनीच आखडता ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या काही दिवसांत जिल्हा राज्यात अव्वल राहिला; परंतु नंतर सर्वांनीच आखडता हात घेतला आणि जिल्ह्यातील लसीकरणाची घसरण झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्यकर्मी, दुसऱ्या फ्रंटलाइन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन झाले. लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा सर्वांच्या मनात गैरसमज होता. लस घेतल्यावरही काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात आले, परंतु अनेकांनी काळजी घेतली नाही.
दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने इतरांना लस घेण्याचे आवाहन करण्यासह स्वत: पुढे होऊन लस घेतली. पहिला डोस पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी आणि दुसरा डोस १६ फेब्रुवारीला घेतला; परंतु रविवारी थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या डॉक्टरसह जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि एक आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लस घेतली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही बाधित आलेल्या डॉक्टरने केले आहे.