उपमुख्यमंत्री पवारांची सभा संपून तीन दिवस झाले, स्वागताचे बॅनर काढताना युवकाने प्राण गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:00 PM2024-10-03T16:00:25+5:302024-10-03T16:01:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
माजलगाव ( बीड) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या निमित्त अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरातील मुख्य रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना लावण्यात आले होते. यातीलच धरणाच्या कमानीजवळ लावलेले एक बॅनर काढताना वीज वाहक तारेला बॅनरचा स्पर्श होऊन गौतम सरपते ( रा.केसापुरी ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी रात्री ११ वाजता घडली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वागताचे बॅनर सिंदफणा नदी पात्र ते केसापुरी कॅम्पपर्यंत लावले होते. ५ किमीपर्यंत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरातून चालणे मुश्किल झाले होते. या लावण्यात आलेल्या बॅनरला माजलगाव नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाकडून कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती.
दरम्यान, बाजारसमितीचे सभापती यांनी धरणाच्या कमानीजवळ त्यांचे स्वतःचे बॅनर लावले होते. हे बॅनर देखील विनापरवानगी लावण्यात आले होते. बुधवारी रात्री अकरा वाजता हे बॅनर काढत असताना बॅनरचा स्पर्श वीज वाहक तारेस झाल्याने विजेचा धक्का बसून गौतम हरपते ( २५ ) या युवक कोसळला. त्याला खाजगी रुग्णालयास उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
गुन्हा दाखल, तरी बॅनर जागेवर
उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होऊन ३ दिवस झाले. तरी रस्त्यावर लावलेले अनधिकृत कटआउट, बॅनर अद्याप तसेच आहेत. हे काढत असताना युवकाचा मृत्यू झाला. जनसन्मान यात्रेच्या आयोजकांना याचे कसले सोयर सुतक नसल्याचे दिसून आले. चार दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. मात्र, रस्त्यावर जागोजागी अडथळा निर्माण करणाऱ्या या कट आउट बॅनर अद्याप काढलेले नाही.
लोकमतने छापले होते वृत्त
अजित पवार यांच्या स्वागतासाठी विनापरवाना मुख्य रस्त्यावर होल्डिंग व बॅनर लावण्यात आले होते. त्याचबरोबर कार्यक्रम स्थळी चोरून विजेचा वापर केला जात होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर डीपीवर टाकण्यात आलेले आकडे काढण्यात आले. परंतु हे बॅनर न काढल्यामुळे एका युवकाचा बळी गेला.