दरोड्याच्या प्रयत्नातील तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:23 AM2019-07-15T00:23:17+5:302019-07-15T00:24:08+5:30
दरोडा टाकण्याचा प्लान करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन तरुणांना श्हरातील भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केले.
बीड : दरोडा टाकण्याचा प्लान करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन तरुणांना श्हरातील भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून लोखंडी पाईप, मिरची पूड, मोबाईल, दुचाकी आणि बॅटरी असा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान इतर दोघे जण पसार झाले.
शहर आणि परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे म्हणून रात्रीच्या दरम्यान पोलिसांची गस्त सुरु आहे. दरम्यान पहाटे दोन वाजेच्या सुमारास भक्ती कन्ट्रक्शन भागातील व्यंकटेश पब्लिक स्कूलच्या प्रांगणात काही तरुण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आपला मोर्चा भक्ती कन्स्ट्रक्शन्स परिसरात वळविला. या भागात काही तरुण संशयितरित्या आढळून आले. पोलिसांना पाहताच दोघेजण पळून गेले तर एका दुचाकीवरून तिघे जण पळून जाताना पोलिसांनी त्यांना पकडले. ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता अमोल संजय बारसकर (१८, रा. भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड) प्रवीण प्रकाश कोकाटे (२०, रा. माळी गल्ली बीड), राहुल विष्णूपंत वलेकर (३०, रा. शाहूनगर) असे त्यांनी आपले नाव सांगितले. जे दोन तरुण पळून गेले त्याबाबत पोलिसांनी या तिघांना विचारले असता त्यामध्ये सनी शाम आठवले (रा. माळीवेस बीड) व शेख राजू ऊर्फ कल्ला शेख अजिज (रा. बांगरनाला, गोरे वस्ती बीड) असे सांगितले.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, फेरोज खान पठाण, शेख सलीम, पो.नाईक राऊत, उजगरे, चालक तांदळे यांनी केली. आरोपींविरोधात दरोड्याचा गुन्हा करण्याचा प्रयत्न करणे कलमाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास शिवाजीनगर ठाण्याचे एपीआय शेख व पो.कॉ. हंबर्डे हे करत आहेत.
हे साहित्य आरोपींकडून केले जप्त
पकडलेल्या प्रवीण कोकाटेकडून एक ८० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, अमोल बारसकर याच्याकडून दुचाकी, एक पाईप, दोन लोखंडी बेसबॉल खेळण्याच्या स्टीक आढळून आले.
आरोपी राहुल वलेकर याच्याकडे एक मोबाईल, कॅरी बॅग, त्यामध्ये सुती दोरीचे बंडल, मिरची पूड, एक बॅटरी असे साहित्य आढळून आले.