गेवराईत तीन घरे, दुकान फोडून लाखोंचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:21 AM2019-12-24T00:21:15+5:302019-12-24T00:22:18+5:30
शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
गेवराई : शहरातीलमध्ये वस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील तीन घरे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील शिवसेना कार्यालयाजवळील एक मशिनरी दुकान फोडून दुकानातील पाण्याच्या मोटारी चोरून नेवून लाखो रुपयांचे साहित्य घेवून चोरटे लंपास झाले. पोलिसांना मागील घटनेचाच तपास लागला नाही तोच पुन्हा ही घटना घडली आहे.
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या धनगर गल्ली येथील रहिवासी व व्यापारी कैलास लोया यांच्या घराच्या मागील बाजुने अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले एक लाख रूपयांचे सोन्याचे दागिने व नगदी तीन लाख रूपये लंपास केले. त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या संदीप टोनपे यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्यांच्या ही घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश करून कपाटातील ४ तोळे सोने व नगदी ३० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्याच समोर असलेले लाईनमन अनंता वडघणे यांच्या घरातील एका खोलीत प्रवेश करून कपाट उचकले मात्र यात काहीच सापडले नाही.
राष्ट्रीय महामार्गावरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूस असलेल्या अजित राका यांच्या अनमोल मशिनरी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील ५ एच.पी.च्या ८ पाण्याच्या मोटारी, ७ एच.पी.च्या २ मोटार, ३ एच.पी.च्या ३ मोटारी व नळाच्या ३ मोटारी तसेच नगदी १७ हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदरील घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून, सकाळी बीड येथील श्वान पथक मागवण्यात आले होते. याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
नागरिकांत भीतीचे वातावरण
शहरातील खक्का मार्केटमध्ये राहणारे प्रवीण शर्मा यांच्या घरावर १ एप्रिल रोजी दरोडा टाकण्यात आला. यात त्यांच्या आई पुष्पाबाई शर्मा यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याला आठ महिने उलटूनही तपास लागला नाही.
दुसरी घटना शहरातीलच रंगार चौक भागात आॅक्टोबर महिन्यात एक वकील, बँक कर्मचारी तसेच एका महिलेच्या घरात चोरट्यांनी जबरी चोरी करून लाखो रूपयांचा माल लंपास केला होता. याचाही तपास लागला नाही. तोच पुन्हा ही तिसरी मोठी घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.