तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप; बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:26 AM2018-06-23T00:26:44+5:302018-06-23T00:27:44+5:30
मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.
बीड : मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.
शेख जावेद शेख मैनुद्दीन [२३, रा. शेवगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर] असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. शेख अन्सार, शेख शहाबाज, शेख नसीर अशी जन्मठेप ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. १८ डिसेंबर २०१५ रोजी पेठ बीड भागातील चंदनशाह दर्गासमोर रात्रीच्या वेळी जावेदचा खून झाला होता. १४ डिसेंबर रोजी जावेद हा शहेंशाहवली दर्गा येथे संदल ऊर्स असल्याने बीडला आला होता. चार दिवस राहिल्यानंतर १८ तारखेला तो सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. मोबाईलही बंद येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जावेदचा मृतदेह दर्गासमोरील कब्रस्तानमध्ये आढळून आला. त्यानंतर जावेदचा भाऊ शेख फिरोज याने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता ओळख पटली. त्यानंतर पेठ बीड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता.
पोलीस चौकशीत शेख फिरोज याने भाऊ जावेद व शेख अन्सार याचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे सांगितले. अन्सार व त्याच्या साथीदारांनी माझ्या भावाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची फिर्याद फिरोजने पेठ बीड ठाण्यात दिली. तत्कालीन सपोनि बी. डी. पावरा यांनी प्रकरणाचा तपास करून चार आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. दोन विधि संघर्ष बालकांना चौकशीअंती सोडून दिले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले.
तपासादरम्यान घटनेच्या दिवशी रात्री ११.३० वाजता चंदनशाह दर्गासमोर शेख अन्सारने जावेद यास लाकडी दांड्याने मारले. त्यानंतर त्याला उचलून कब्रस्तानमध्ये नेल्याचे सिद्ध झाले. एका साक्षीदाराने ही घटना आपण पाहिल्याचे पोलीस व न्यायालयासमोर सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही दांड्याने मारहाण झाल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीजन्य पुरावा व इतर बाबी न्यायालयात सिद्ध झाल्याने बीड येथील पहिले सत्र न्या. बी. बी. वाघ यांनी शेख अन्सार, शेख शहाबाज व शेख नसीर या तिघांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चौथा आरोपी सय्यद आमेर सय्यद चाँद विरोधात ठोस पुरावा न मिळाल्याने त्याची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.
अन्सार विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार
येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी यांना वैयक्तिक व्हिडीओ पाठवून या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख अन्सार याने ब्लॅकमेल केल्याची तक्रार कुरेशी यांनी शहर ठाण्यात दिली होती. व्हिडीओ असलेले मेमरी कार्ड मयत जावेदने चोरले होते. त्यामुळे अन्सारची कोंडी झाली होती. याच रागातून आपल्या साथीदारांच्या मदतीने जावेदचा काटा काढल्याचे सिध्द झाले. या घटनेत जावेद कुरेशी, शेख रहीम व शहर ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.