दोन एकरांत बटाटे लागवडीतून तीन लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:07+5:302021-05-07T04:35:07+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकरी बाळासाहेब शामराव आढाव यांनी प्रथमच दोन एकरांत बटाट्याची लागवड करीत ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकरी बाळासाहेब शामराव आढाव यांनी प्रथमच दोन एकरांत बटाट्याची लागवड करीत त्याद्वारे केवळ तीन महिन्यांत तीन लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले.
माजलगाव तालुक्यातील शेतकरी ऊस, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, बाजरीसह इतर महत्त्वाच्या पिकांच्या लागवडीला महत्त्व देतात. परंतु खरात आडगाव येथील शेतकऱ्याने कोणालाही न विचारता बटाटे लावण्याचे ठरविले. नोव्हेंबरमध्ये बटाट्याचे महागाचे बियाणे पुणे जिल्ह्यातील या ठिकाणावरून घेत दोन एकर शेतात अडीच फुटांवर बटाट्याची लागवड केली. लागवडीची माहिती नसल्याने ज्या ठिकाणी बियाणे घेतले त्याच ठिकाणी याची लागवड कशी केली जाते याविषयी माहिती घेतली. यावर अधूनमधून फवारणी करायची व पाणी द्यायचे याची माहिती घेत शेतात बटाट्याची लागवड केल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले. ८५ दिवसांत याला पाणी, फवारणी व खते दिल्यानंतर बटाट्याचे चांगले उत्पन्न निघाले. तीन महिन्यांत दोन एकरांत १६ टन बटाटे निघाले. या बटाट्याला जागेवर २२ ते २५ रुपये भाव मिळाल्याने या शेतकऱ्यास ३ लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. या शेतकऱ्यास जवळपास ६० ते ६५ हजार रुपये खर्च आला. यामुळे या शेतकऱ्यास २ लाख ६० हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.
आपल्या भागात बटाटे लागवड होत नाही; परंतु आमचा आपल्या शेतात बटाटे लागवडीचा अनेक वर्षांपासून विचार करीत होतो. पण यावर्षी आम्ही लागवड करीत कमी दिवसांत चांगले उत्पन्न मिळविले. यामुळे यापुढे आपल्या भागातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे वळावे व चांगले उत्पन्न मिळवावे.
- बाळासाहेब आढाव, बटाटा उत्पादक शेतकरी