स्वारातीमध्ये कोविड रुग्णांसाठी आणखी तीन वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:40+5:302021-04-20T04:34:40+5:30

अंबाजोगाई : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणखी तीन वॉर्ड वाढविण्यात आले असून ...

Three more wards for covid patients in Swarati | स्वारातीमध्ये कोविड रुग्णांसाठी आणखी तीन वॉर्ड

स्वारातीमध्ये कोविड रुग्णांसाठी आणखी तीन वॉर्ड

Next

अंबाजोगाई : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणखी तीन वॉर्ड वाढविण्यात आले असून मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय चव्हाण व डॉ. सचिन चौधरी यांच्यावर आता आठ तास रुग्ण सेवेची जबाबदारी सोपविली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाच्या बिल्डींगमधील तळमजल्यावरील तीनही वॉर्ड कोविड रुग्णांसाठी सुरू करण्याची सूचना विधान परिषदेचे सदस्य संजय दौंड यांनी केली होती. त्यानुसार या तीनही वॉर्डामध्ये सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. या तळमजल्यावरील अतिदक्षता विभाग वरच्या मजल्यावर हलवून हे तीनही वॉर्ड कोविड रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहेत. कोविड रुग्णसेवेचे आता तीन विभाग करण्यात आले असून यामुळे विभाग प्रमुख डॉ. बिराजदार यांच्यावर सततचा येणारा ताण कमी होणार आहे.

कोविड महामारीचा जेवढा थेट संबंध मेडिसीन विभागाशी येतो त्याहीपेक्षा जवळचा संबंध मेडिसीन विभागाशी संलग्न असणाऱ्या क्षयरोग विभागाशी येतो. कोविड रुग्णांच्या उपचाराचे निदान रुग्णांच्या छातीचा एक्स रे व सिटी स्कॅनवर अवलंबून असते. यांचे योग्य निदान क्षय रोग विभागाने करावयास हवे. मात्र, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्षयरोग विभाग प्रमुखांचा कोविड रुग्ण सेवेत अद्याप काहीच सहभाग दिसत नाही. त्यांना कोविड रुग्ण सेवेत सहभागी करून आठ तास ड्युटी लावण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. क्षयरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल मस्के हे सतत सारी व कोविड रुग्णांची सेवा करताना दिसतात. यामुळे ते दोन वेळेस पॉझिटिव्हदेखील आले होते.

गिरवलकर तंत्रनिकेतनमध्ये ३०० खाटांची व्यवस्था

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील टी. बी. गिरवलकर तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात ३०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची तयारी संस्थेच्यावतीने आणि प्राचार्य बी. आय. खडकभावी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात येऊन हे ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

डॉक्टर व इतर स्टाफचे काय?

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मानवलोकने ८० बेडच्या रुग्णालयाची उभारणी पूर्ण केली आहे. तर टी.बी. गिरलवकर तंत्रनिकेतन महाविद्यालयाने आपल्या वसतिगृहात ३०० बेडची व्यवस्था केली आहे. नव्याने व्यवस्था करण्यात आलेल्या या ४०० रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डॉक्टर व इतर स्टाफची व्यवस्था करण्यात आता आरोग्य विभाग किती दिवस घेतो व किती आरोग्य सेवा पुरवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Three more wards for covid patients in Swarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.