टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 02:29 PM2022-02-28T14:29:31+5:302022-02-28T14:31:06+5:30
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
अंबाजोगाई (बीड) : तीन महिन्यापूर्वी अंबाजोगाईतील मोंढ्यातून आडत दुकानासमोर लावलेला टेंपो त्यातील २३६ सोयाबीनच्या कट्ट्यासह चोरीला गेला. अखेर या चोरीचा छडा लावण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले आहे. सदर टेंपो पोलिसांना यापूर्वीच सापडला होता. तर चोरीला गेलेले सोयाबीनचे सर्वच्या सर्व २३६ कट्टे पोलिसांनी जालना जिल्ह्यातून जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
अंबाजोगाई मोंढा मधील आडत व्यापारी अनंत मदनराव मुंडे यांनी ११ नोव्हेंबर रोजी २३६ कट्टे सोयाबीन परळीला पाठवण्यासाठी टेंपोत (एमएच २४ एफ ५९६९) भरून तो दुकानाबाहेर उभा केला होता. रात्रीतून सदर टेम्पो सोयाबीनसह चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल बनसोडे (रा. अंबाजोगाई) याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने सदर टेंपो आणि सोयाबीन संजय आदमाने (रा. अंबाजोगाई) याच्याकडे असून त्याने ते कोणाला आणि कुठे विकले आहे याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
दरम्यान, काही दिवसांनी पोलिसांना सदरील टेंपो बेवारस अवस्थेत जालना जिल्ह्यातील घनसावंगी परिसरात आढळून आला, मात्र त्यात सोयाबीनचे कट्टे नव्हते. पोलिसांनी राहुलला अटक केल्याची माहिती मिळताच संजय आदमाने फरार झाला होता. त्याने सर्व प्रकारचा संपर्क तोडल्याने त्याला शोधणे अवघड झाले होते. काही दिवस उलटल्यानंतर पोलिसांचा तपास थंड पडल्याच्या भ्रमात संजय उघड माथ्याने फिरू लागला. मात्र, पाळतीवर असलेल्या पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी तीन दिवसापूर्वी संजयला शेपवाडी परिसरातील एका ढाब्यावरून ताब्यात घेतले.
कॉल डिटेल्समधून लावला खरेदी करणाराचा शोध
सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या संजयने पोलिसी खाक्या दाखवताच चोरलेले सोयाबीन घनसांगवी (जि. जालना) तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील राऊत नामक व्यक्तीला विकल्याचे सांगितले. राऊत बाबत अधिक माहिती संजयलाही नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले आणि त्यातून सोयाबीन खरेदी कलेल्या बाळासाहेब राऊत याचे नाव समोर आले.
दुसरीकडे विक्री करण्यापूर्वीच सोयाबीन जप्त
खरेदी करणाऱ्याची माहिती मिळाल्यानंतर अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी, पो.कॉ. नरहरी नागरगोजे, घोळवे आणि पो.ना. येलमाटे यांचे पथक जालन्याला पाठवले. हे चोरीचे सोयाबीन राऊत लवकरच एका आडत्याला विकण्याच्या बेतात होता. परंतु, अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने दोन दिवस पाळत ठेऊन त्याला अटक केली आणि त्याच्या शेतातून चोरीच्या सोयाबीनचे २३६ कट्टे जप्त केले. या कामगिरीबद्दल शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
एक आरोपी अद्याप फरार
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत राहुल बनसोडे, संजय आदमाने आणि बाळासाहेब राउत या तिघांना ताब्यात घेतले होते. याव्यतरिक्त आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना अपेक्षा आहे.