परळी थर्मलचे तीन संच बंद, २१ दिवसांपासून वीजनिर्मिती ठप्प - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:16+5:302021-05-29T04:25:16+5:30
परळी : येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद असल्याने वीजनिर्मिती शून्यावर आली आहे. मागील २१ दिवसांपासून हे ...
परळी : येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद असल्याने वीजनिर्मिती शून्यावर आली आहे. मागील २१ दिवसांपासून हे संच बंद आहेत. परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहरी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे नवीन औष्णिक विद्युत केंद्र आहे. या केंद्रात प्रत्येकी २५० मेगावॉट क्षमतेचे तीन संच आहेत. संच क्रमांक ६, ७ व ८ हे तीन संच ६ मेपासून बंद आहेत. त्यामुळे या संचांतून होणारी वीजनिर्मिती ठप्प आहे. संच बंद असले तरी नवीन औष्णिक विद्युत केंद्रामध्ये नियमित व दुरुस्तीची कामे चालू आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या कामावर परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
बाजारपेठेवर परिणाम
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील जुने संच क्रमांक १, २, ३, ४, ५ हे पाच संच गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. आयुर्मान संपल्याने संच क्रमांक १ व २ हे कायमस्वरूपी काही वर्षांपूर्वीच बंद करण्यात आले आहेत, तर संच क्रमांक ३, ४ व ५ हे तीन संच पाच वर्षांपासून बंद आहेत. हे पाच संच बंद असल्याने शेकडो कामगारांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली. या संच बंदचा परळी बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला आहे.
--------
वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही
लॉकडाऊनमुळे राज्यात विजेची मागणी कमी असल्याने नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद ठेवण्याबाबत महानिर्मितीच्या वरिष्ठांचा आदेश आहे. त्यानुसार हे तीन संच बंद करण्यात आले आहेत. संच सुरू करण्याचे आदेश येताच वीजनिर्मिती सुरू होईल. तीन संच बंद असले तरीही कंत्राटी कामगार कमी केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची सध्या वेळ नाही.
- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, परळी औष्णिक विद्युत केंद्र, परळी.
कामगारांची उपासमार
या जुन्या संचांच्या बदल्यात नवीन संच क्रमांक ६, ७, ८ हे तीन संच उभारलेले आहेत. ते तीन संच सध्या २१ दिवसांपासून बंद आहेत. परळीत गेल्या महिन्यापासून कोरोनोमुळे लॉकडाऊन असल्याने विविध क्षेत्रांतील अनेक कामगारांच्या हाताला काम नाही. लॉकडाऊनच्या कडक नियमामुळे रस्त्यावरून कामासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- पंडित झिंजुर्डे, माजी नगरसेवक, परळी.