तेलगावमध्ये १० दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 11:37 PM2019-11-07T23:37:52+5:302019-11-07T23:38:28+5:30
तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत.
बीड : तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. यावेळी दुकानातील लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
तेलगाव (ता. धारूर) या गावातून ५४८ सी हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या राष्ट्रीय महामार्गालगतच स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुल असून या व्यापारी संकुलात ३० दुकाने आहेत. या संकुलात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. एकाच रांगेत असेलेल्या १० दुकानाच्या छतावरील पत्रे उपसून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला व दुकानातील विविध वस्तुंसह रोख रक्कमांवर डल्ला मारला. यात गोरख राठोड यांच्या दुकानातून ९० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा चोरला. दत्ता मोरे यांच्या श्रीराम पान मटेरियल मधील रोख २० हजार रुपये व इतर सामान असे मिळून ७० हजार रुपये लंपास केले. गोविंद तिडके यांच्या इलेक्ट्रॉनिक मधील २ एलईडी टी.व्ही. सह इतर साहित्य. शेख तन्वीर यांच्या सहारा आॅटोमोबाईल्स मधील आॅईल व इतर सामान, अण्णासाहेब काळे यांच्या जनरल स्टोअर्समधील खेळणी साहित्य, अण्णासाहेब तिडके यांच्या आॅनलाईन सर्व्हिस मधील ३५ हजाराचे लॅपटॉप, बापुराव धुमाळ यांच्या इलेक्ट्रीकल्स मधील रोख ६ हजार रुपये. तर मुंजा शेळके यांच्या किराणा दुकानातील रोख दीड लाख रुपये या चोरट्यांनी लंपास केले आहेत. याप्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्त वाढवण्याची मागणी
सदरील घटनेमुळे व्याºयासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून दिद्रुड पोलिसांकडून होत असलेल्या बेपरवाईमुळेच ही घटना घडल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले. रात्री गस्त घालणे बंधनकारक असताना देखील अनेक वेळा पोलिसांकडून गस्त घातली जात नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. तात्काळ चोरांना अटक करावी व गस्त वाढवावी अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे.
चोरट्यांनी मारला बिर्याणी हाऊसमध्ये ताव
या परिसरात असलेल्या एका बिर्याणी हाऊसमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला होता. यावेळी त्याठिकाणी ठेवलेल्या अंड्यावर चोरट्यांनी ताव मारला. तसेच सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे बिर्याणी चालकाने सांगितले.
तसेच एका जनरल स्टोअर्समधून डोक्याला लावण्याच्या तेलाच्या बाटल्या देखील चोरांनी लंपास केल्या.