राज्यात तिघाडा, वॉर्डात बिघाडा; इच्छुक उमेदवारांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:32+5:302021-09-25T04:36:32+5:30
बीड : एक प्रभाग एक नगरसेवक अशी घोषणा झाल्यानंतर पुन्हा तो निर्णय बदलून एक प्रभाग दोन नगरसेवक असा करण्यात ...
बीड : एक प्रभाग एक नगरसेवक अशी घोषणा झाल्यानंतर पुन्हा तो निर्णय बदलून एक प्रभाग दोन नगरसेवक असा करण्यात आला आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तिघाडा आहे. आता वॉर्डातही पहिल्यासारखेच दोन नगरसेवक देऊन बिघाडा होणार आहे. आपण कामे केले, हे दाखविण्यासाठी चढाओढ लागण्यासह पुढेही आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावणे सुरू झाले आहे. चार भिंतीतील चर्चाही वाढल्या असून अनेकांची झोपही उडाली आहे. सत्तांतर झाले की जो तो आपल्या फायद्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतो. नगर पंचायत, नगरपालिका आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनच पुढील समीकरणे अनेकदा ठरविले जातात. त्यामुळे प्रत्येक जण यात आपली ताकद वापरतो. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रभाग रचना आणि नगरसेवकांवरून खल सुरू झाला. अखेर दोन नगरसेवक पद्धतीला मान्यता मिळाली. या निर्णयाचे काही ठिकाणी स्वागत होते तर काहींना गम असल्याचेही सांगण्यात येते. असे असले तरी इच्छुक उमेदवार आतापासून आघाडीच्या प्रमुखांकडे हजेरी लावत आहेत. दिवसरात्र संपर्कात राहण्यासह आपले काम किती चांगले आहे, हे दाखविण्यासाठी धडपड करत आहेत. आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही, या भीतीने अनेकांची झोपही उडाली आहे.
---
बीड पालिकेत काय घडले?
बीड पालिकेत काका-पुतण्यात रंगत झाली होती. यात आ. संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीचे २० नगरसेवक निवडून आले होते तर डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे स्वत: नगराध्यक्ष आणि आपल्या गटाचे १८ नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी झाले होते. एमआयएमनेही ९ जागांवर यश मिळविले होते. भाजप १ आणि शिवसेनेचे दोन तसेच स्वीकृत ५ सदस्य असे ५५ नगरसेवक पालिकेत आहेत. एमआयएमने सुरुवातील आ. क्षीरसागरांना मदत केल्याने नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर असले तरी सत्ता आ. क्षीरसागरांची होती. परंतु वर्षभरातच एमआयएमने आ. क्षीरसागरांची साथ सोडत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे बाजू पलटून डॉ. क्षीरसागरांकडे आली. आजही त्यांचेच पारडे जड आहे.
--
फायदा काय अन् तोटा काय?
एक प्रभाग दोन नगरसेवक असल्याचा फायदा अन् तोटाही आहे. एकाच प्रभागात दोन वेगळ्या आघाडीचे नगरसेवक निवडून आल्यास विकासाला खीळ बसू शकते. आपली सत्ता नाही तर काम का करायचे, असाही विचार डाेक्यात येऊ शकतो, अशी काही तोटे आहेत. तर दोघांनी मिळून काम केल्यास प्रभाग आदर्श व विकासमय बनू शकतो. तसेच चढाओढीने कामे केले जाऊ शकतात. परंतु हे सर्व नगरसेवकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे, हेही तितकेच खरे आहे.
--