आयएमएच्या राज्याध्यक्षपदासाठी तिरंगी लढत; बीडच्या १७२ डॉक्टरांनी बजावला हक्क
By सोमनाथ खताळ | Published: October 10, 2023 11:59 PM2023-10-10T23:59:00+5:302023-10-10T23:59:15+5:30
मतदान प्रक्रिया शांततेत, दिवाळीपर्यंत लागणार निवडणुकीचा निकाल
सोमनाथ खताळ, बीड: इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदासाठी बीड शाखेने मतदान केले. ३४१ पैकी १७२ डॉक्टरांनी आपला हक्क बजावला. यावर्षीही अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, आयमएएच्या हॉलमध्ये मंगळवारी दुपारी ४ ते ६ यावेळेत ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवाळीपर्यंत याचा निकाल लागणार आहे.
आयमएचे राज्यभरात ९ विभाग आहेत. यात मुंबई शहर, मुंबई ग्रामीण व कोकण, मुंबई सबर्न, पुणे शहर, पुणे ग्रामीण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदींचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी एका विभागाला अध्यक्ष पदाची संधी दिली जाते. यावेळी रोटेशननुसार मुंबई विभागाचा क्रमांक असून तेथीलच डाॅ. संतोष कदम, डाॅ.मंगेश पाटे व डाॅ. राजीव अग्रवाल असे तीन उमेदवार आहेत. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मंगळवारी बीडमध्ये मतदान घेण्यात आले.
यामध्ये डॉ.बी.आर.पंडित, डाॅ.रोहिणी वैद्य सारख्या ज्येष्ठांपासून ते नवोदित आय. एम. ए. सभासदांनी आपला हक्क बजावला. आतापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होत असे. परंतू मागील वर्षी पासून यात लढत होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ही संघटना पुढील काळात एकसंघ राहील का? याबाबत संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, रोटेशन प्रमाणे २०२०-२१ मधे मराठवाडा विभागाचे कळंब येथील डाॅ. रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच २००९ साली हा बहुमान मराठवाड्याला मिळणार आहे. सध्याच्या उमेदवारांमध्ये राज्य सचिव असलेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले डाॅ. संतोष कदम यांचे पारडे जड वाटत आहे. ते परभणी येथील जावई असल्याने त्यांच्याबाबत मराठवाड्यातील डॉक्टरांकडून झुकते माप दिले जावू शकते, असेही सांगण्यात आले.