सिरसाळ्यात थरार! पत्नी, मुलीची धारदार शस्त्राने हत्या करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:01+5:302021-09-26T04:36:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिरसाळा(जि.बीड) : पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करून निर्दयी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरसाळा(जि.बीड) : पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करून निर्दयी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा थरार सिरसाळा (ता. परळी) येथील मोहा रोडवर २४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक कलहातून पतीने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्लाहबक्ष अहमद शेख (२८), शबनम शेख (२२) व अशफिया (२) अशी मयतांची नावे आहेत. अल्लाहबक्ष हा परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात वेल्डिंगचे काम करायचा. पाथरी (जि. परभणी) येथे २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या नातेवाइकांचा विवाहसोहळा होता. त्यासाठी अल्लाहबक्ष याचे सासू-सासरे मुंबईहून येणार होते. दरम्यान, सासऱ्याने फोन करून सोबत जाऊ असे सांगितले, तेव्हा अल्लाहबक्ष याने तुम्ही पुढे जा मी मागून येतो, असे सांगितले. त्यानंतर तो लग्नसोहळ्याला गेलाच नाही. त्याचे भाऊ व शेजारीही या लग्नसोहळ्यास गेले होते. दरम्यान, अल्लाहबक्ष व पत्नी शबनम यांच्यात सतत वाद सुरू होते. २४ सप्टेंबर रोजीदेखील पती- पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अल्लाहबक्ष याने पत्नी शबनमच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. यावेळी अशफिया जवळच होती. ती जोरजोराने रडू लागली, त्यामुळे त्याने चिमुकलीच्या गळ्यावरही चाकूने वार करून संपविले. यानंतर त्याला पश्चात्ताप झाला, त्यामुळे त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. भाऊ मुजीब अहमद शेख यांच्या तक्रारीवरून मयत अल्लाहबक्षवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने सिरसाळा सुन्न झाले आहे.
....
दहा वाजेपासून फोन बंद
दरम्यान, अल्लाहबक्ष याचे सासरे पाथरी येथे लग्न सोहळ्यात पोहोचले; पण जावई व लेक न आल्याने ते संपर्क करत होते. सकाळी दहा वाजता अल्लाहबक्षशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर दिवसभर मोबाइल बंद येत होता. त्यामुळे सासरे काळजीत होते. रात्री दहा वाजता ते सिरसाळ्यात पोहोचले. दरवाजा ढकलून आत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना लेक व नात रक्ताच्या थारोळ्यात तर जावई फासावर लटकलेला आढळला.
...