धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 01:32 PM2022-01-26T13:32:52+5:302022-01-26T13:33:28+5:30
Dharur : बिल नाही मिळाल्यास कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पवन तट यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला होता.
धारूर : धारूर शहरातील मंडप व्यावसायिक पवन तट यांनी कोरोना काळात तहसीलदार यांच्या आदेशाने कोरोना सेंटरला रुग्णांसाठी बेड, बेडशीट व इतर साहित्य पुरवले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही प्रशासनाने पवन तट यांचे बिल अदा केले नसल्यामुळे त्यांनी आज ध्वजारोहनानंतर थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, आ. प्रकाशदादा सोंळके यांनी या तरूणाची भेट घेऊन तात्काळ बिल काढण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनासारख्या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता विविध साहित्य प्रशासनाच्यावतीने ज्या-ज्यावेळी मागण्यात आले, त्या त्यावेळी वेळेची पर्वा न करता साहित्य प्रशासनाला पुरविण्याचे काम पवन तट यांनी केलेले आहे. मात्र या दिलेल्या साहित्याचे देयक वारंवार तहसीलदार यांना मागणी करून मिळत नसल्याने पवन तट यांनी टोकाची भूमिका घेतली. हे बिल मिळवण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा मंडप व्यावसायिक पवन तट यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
2019-20 या काळात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला होता. अशा परिस्थितीत रुग्णांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीने कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले होते. या कोरोना सेंटरला रुग्णांसाठी लागणारे बेड, बेडशीट व इतर साहित्य पुरवण्यासाठी धारूर तहसीलदार यांच्यावतीने आदेश दिले होते. आदेशाप्रमाणे प्रशासनाला जीवाची पर्वा न करता कामगारांना सोबत घेऊन जे मागतील ते साहित्य वेळोवेळी पुरवण्याचे काम पवन तट यांनी केले.
कालांतराने कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने कोरोना सेंटर बंद करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या साहित्याचे बिल 3 लाख 42 हजार रुपये तहसीलदार यांना सुपूर्द केले. वारंवार तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या, मात्र दोन वर्षे उलटूनही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्याप मिळाले नाही. याप्रकरणी 05 जानेवारी 2022 ते 26 जानेवारी 2022 या काळात बिल नाही मिळाल्यास कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पवन तट यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला होता.
ध्वजारोहनानंतर केला आत्मदहनाचा प्रयत्न
आज प्रजासत्ताक दिनाचे तहसील कार्यालयात 9 वाजून 15 मिनिटाला तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. यानंतर तहसीलदार व इतर अधिकारी दालनाकडे जात असताना अचानक पवन तट यांनी भारत माता की जय म्हणत अंगावर पेट्रोल ओतून घेतले. यावेळी तात्काळ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंद बाष्टे यांनी पवन तट यांना ताब्यात घेतले.
ध्वजवंदन करण्यासाठी उपस्थित होते पोलीस
तहसील कार्यालयाचे मुख्य ध्वजवंदन करण्यासाठी यावेळी पोलीस निरिक्षक नितिन पाटील यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते. यामुळे तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी तहसीलदार शिडोळकर यांनी दोन दिवसांत बिल अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी पवन तट यांना पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, आमदार प्रकाशदादा सोंळके यांनी पवन तट यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून तात्काळ बिल देण्याच्या सूचना दिल्या.