थरारक! साडेतीन लाखांसाठी ऊसतोड मुकादमाला ३६ दिवस डांबले;पोलिसांनी कराडमधून केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 04:54 PM2022-03-10T16:54:00+5:302022-03-10T16:54:51+5:30
मुकादमास सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले.
बीड : येथील एका ऊसतोड मुकादमाला साडेतीन लाख रुपयांसाठी बीडमधीलच दोन मुकादमांनी डांबून ठेवले होते. बीड शहर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३६ दिवसांनंतर कराड येथून त्याची ८ मार्च रोजी सुटका केली. यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे.
श्रीमंत यादवराव राजपुरे (५५, रा.पारगाव सिरस, ता.बीड), असे अपहृत मुकादमाचे नाव आहे. त्यांच्याकडे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर असून, मजूरही पुरवितात. दरम्यान, अप्पा द्वारकू फरताडे (रा. मलकाची वाडी, ता.शिरूर) हा ऊसतोड मुकादम असून, त्याने सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना, यशवंतनगर (ता. कराड) सोबत करार केला होता. राजपुरे यांनी सहा जोड्या व ट्रॅक्टर पुरविण्यासाठी फरताडेंकडून साडेचार लाख रुपये उचल घेतली होती. मात्र, मजूर व ट्रॅक्टर न पुरविल्याने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा सुरू झाला. १२ फेब्रुवारी रोजी राजपुरे हे शहरातील अंबिका चौकात भाजीपाला विक्री करीत होते. यावेळी त्यांचे चारचाकी वाहनातून अप्पा फरताडे व त्यांचा कामगार अर्जुन तुकाराम टुले (रा. नवगण राजुरी, ता.बीड)
या दोघांनी अपहरण केले.
श्रीमंत राजपुरे यांना कराड येथील कारखान्यावर नेऊन एका खोलीत डांबले. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी राजपुरे यांनी फोनवरून अपहरण झाल्याचे कळविले. राजपुरे कुटुंबीयांनी त्यांची सुटका करण्याची विनंती फोनवरून अप्पा फरताडेकडे केली. मात्र, त्याने दाद दिली नाही. अखेर श्रीमंत यांच्या पत्नी जिजाबाई फरताडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली, शिवाय उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली. अखेर अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महादेव ढाकणे व हवालदार बाळासाहेब सिरसाट हे ८ मार्च रोजी कराडला गेले. त्यांनी तेथील तळबीड पोलीस ठाणे व सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने दुपारी चार ते साडेचारदरम्यान अपहृत श्रीमंत राजपुरे यांची सुटका केली. यावेळी अप्पा फरताडे व अर्जुन टुले या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना ९ रोजी न्यायालयात हजर केले असता ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कुटुंबीयांना अश्रू अनावर
दरम्यान, तब्बल ३६ दिवसांनंतर श्रीमंत राजपुरे यांना घेऊन बीड शहर पोलीस ९ मार्च रोजी बीडला पोहोचले. त्यांना सुरक्षित पाहून त्यांची पत्नी व मुले यांना अश्रू अनावर झाले. पोलीस ठाण्यात मुलाने त्यांना मिठी मारली तेव्हा श्रीमंत राजपुरे यांनाही गहिवरून आले.