थरारक ! वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली, वकिलाचे कुटुंब थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 06:41 PM2022-02-12T18:41:25+5:302022-02-12T18:45:25+5:30
अपघात निदर्शनास येताच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली.
गेवराई : दहाव्याचा कार्यक्रम आटोपून परतत असताना औरंगाबाद येथील एका कुंटुबाची कार राक्षसभुवन जवळील वळणावर असलेल्या उजव्या कालव्यात कोसळल्याची थरारक घटना आज दुपारी घडली. दैवबलवत्तर म्हणून आतील कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली.
औरंगाबाद येथील अॅड.अविनाश बांगर कुटुंबासह आज सकाळी पाहुण्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमाला राक्षसभुवन येथे आले होते. कार्यक्रम आटोपून बांगर कुटुंबासह दुपारी दोनच्या सुमारास कारने ( क्रमांक एम.एच 20 एफ.वाय 3302 ) परतत होते. दरम्यान, राक्षसभुवन जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या उजव्या कालव्यात कोसळली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही,
तहसीलदार सचिन खाडे मदतीला धावले
दरम्यान, तहसीलदार सचिन खाडे व बाळासाहेब पखाले,विठ्ठल आम्लेकर हे या मार्गावरून प्रवास करत होते. अपघात निदर्शनास येताच खाडे यांनी तत्काळ गाडी थांबवली. तहसीलदार खाडे यांनी सहकारी आणि नागरिकांच्या मदतीने कालव्यात उतरून कारमधील नागरिकांना बाहेर काढले.