जुना वादातून व्यापाऱ्यावर पेटता दिवा फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 06:30 PM2019-07-03T18:30:12+5:302019-07-03T18:30:45+5:30
पेटत्या दिव्यामुळे व्यापाऱ्याचा हात भाजला आहे.
अंबाजोगाई (बीड ) : जुन्या वादाची कुरापत काढून दोघांनी देवासमोर ठेवलेला पेटता दिवा व्यापाऱ्याच्या अंगावर फेकल्याची घटना अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ भागात हनुमान मंदिरात मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत पेटत्या दिव्यामुळे सदर व्यापाऱ्याचा हात भाजला आहे.
व्यंकटेश पांडुरंग रांदड (रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई) असे या जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यंकटेश रांदड हे मंगळवारी सकाळी १० वाजता घराजवळील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिराच्या पारावर थांबलेले संतोष ईश्वर पुनपाळे (रा. रेणापूर, जि. लातूर) आणि बालाप्रसाद दत्तप्रसाद अजमेरा (रा. अंबाजोगाई) यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यासोबत वाद सुरु केला. वाद वाढल्यानंतर पुनपाळे आणि अजमेरा यांनी रांदड यांना लाथाबुक्क्याने मारहाण सुरु केली. त्यानंतर पुनपाळे याने मंदिरातील पेटता दिवा उचलून रांदड यांच्या हातावर मारल्याने त्यांचा हात भाजला आहे.
यावेळी व्यंकटेश यांचे बंधू दत्तप्रसाद यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी व्यंकटेश रांदड यांच्या तक्रारीवरून पुनपाळे आणि अजमेरा यांच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.