अधिकाऱ्यांच्या त्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी मृतदेह घेतलं ताब्यात; संतोष मुंडेवर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 04:25 PM2022-12-14T16:25:50+5:302022-12-14T16:25:58+5:30
टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड: ग्रामीण भागातील प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांचा विजेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे आज (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. विजच्या झटक्याने संतोषसह त्याचा मित्र बाबुराव मुंडे याचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. संतोषला दोन लहान मुली आणि एक मुलगा आहे. मात्र संतोषच्या अचानक मृत्यूनं पत्नीसह चिमुकली पोरंही पोरकी झाली.
भोगलवाडी येथील विद्युत डीपीचे अनेक केबल उघडे असून तक्रार करून देखील याची दुरुस्ती होत नाही आणि याच केबालचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या आगलथाण कारभारामुळेच या दोघांचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. मात्र महावितरणने योग्य कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. अतिशय गरीब घरातून आलेल्या संतोष मुंडेने आपल्या व्यंगावर मात करत टिक टॉकच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावर संतोषचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग होता. त्याच्या अशा अकाली निधनामुळे सर्वत्र व्यक्त होत आहे.
दरम्यान, संतोषनं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गावरान बाज आणि अस्सल गावरान साज यांचा मेळ संतोषच्या टिकटॉक व्हिडीओंमध्ये चाहत्यांना पाहयला मिळायचा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोषनं आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. संतोष गावरान स्टाईलमधील हटके व्हिडीओंसाठी ओळखला जायचा. टिकटॉकनंतर संतोषनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अल्पावधीतच तो लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"