'...तोपर्यंत कुठलीही लढाई हरणार नाही'; पंकजा मुंडे यांचे तिरंगा रॅलीत भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 04:27 PM2022-08-13T16:27:24+5:302022-08-13T16:35:15+5:30
राज्यातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी मी आग्रही आहे.
परळी (बीड) : राज्यात ओबीसी व मराठा आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी सतत संघर्ष करेन. तुमच्यासारखे सच्चे मावळे सोबत आहेत तोपर्यंत मी कुठलीही लढाई हरणार नाही. फक्त तुमची साथ हवी आहे, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज केले. परळीत मुंडे यांच्या नेतृत्वात आज तिरंगा रॅली काढण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
"घरोघरी तिरंगा" अभियानांतर्गत भाजपच्यावतीने आज शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजा मुंडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. भारतमाता की जय, वंदे मातरम, स्वतंत्र भारताचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अण्णाभाऊ साठे चौक - बस स्थानक - रेल्वे स्थानक - आर्य समाज मंदिर मार्गे मोंढा मैदानात रॅलीचा समारोप झाला. यानंतर झालेल्या सभेला पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. मुंडे म्हणाल्या,'राज्यातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी मी आग्रही आहे. तुमच्यासारखे सच्चे मावळे सोबत आहेत, तोपर्यंत मी कुठलीही लढाई हरणार नाही. फक्त तुमची साथ हवी आहे.'
ज्येष्ठांचा गौरव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधूनवयाची पंचाहत्तरी पुर्ण केलेल्या शहरातील ३१ ज्येष्ठ नागरिकांचा पंकजा मुंडे यांच्याहस्ते पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुंडे यांनी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सत्कारामुळे जेष्ठ नागरिक भावनिक झाले होते.