आमदारांच्या मर्जीतील मुख्याधिकाऱ्यांच्या पुढे नगराध्यक्षांवर नामुष्कीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 01:32 PM2021-07-30T13:32:29+5:302021-07-30T13:46:13+5:30
माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील नगराध्यक्षांनी शुक्रवारी बोलावलेल्या विशेषसभेत मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न आमदार प्रकाश सोळंके यांच्यामुळे बारगळला आहे. मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला ही बैठक शासनाच्या नियमाविरूध्द असल्याने बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र दिल्याने एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांना अखेर सभा रद्द करून पुन्हा तीन वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करावे लागले.
माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे. यामुळे नगराध्यक्षांनी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेत मुख्याधिकारी भोसले यांच्या कामाचे अवलोकन करून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न होता. तसेच मालमत्ता कर मूल्यांकन, पाणीपट्टी, आर्यवैश्य व मराठा भवनाला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार होता. मात्र, मुख्याधिकारी भोसले यांच्यावर आपल्याच मर्जीतील नगराध्यक्षांकडून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आ. प्रकाश सोळंके यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्याधिकारी यांची बाजू घेत नगरसेवकांना त्यांच्यासोबत राहण्यास आ. सोळंके यांनी बजावल्याचे नगरसेवकांतून बोलले जात आहे. यामुळे विशेष सभेत अविश्वास ठराव आणणे बारगळे.
आता ३ वाजता ऑनलाईन बैठक
शुक्रवारी सकाळीच मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी सांगितले की, ही बैठक शासनाच्या नियमाविरुद्ध असल्याने मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. यानंतर एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांनी ही बैठकच रद्द केली. तीन वाजता ऑनलाइन बैठक बोलावण्याची नामुष्की नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्यावर आली.