जोपासलेल्या बागेतील फळे घरासमोर विकण्याची वेळ - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:33 AM2021-04-07T04:33:52+5:302021-04-07T04:33:52+5:30
कडा : कोरोना विषाणूमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल शेतात पडून राहिल्याने जागीच आहे. तसेच काढलेल्या ...
कडा : कोरोना विषाणूमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल शेतात पडून राहिल्याने जागीच आहे. तसेच काढलेल्या शेतमालाला व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अगदी अल्प दरात घरासमोरच विक्री करण्याची वेळ फळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. आता सोमवारपासून राज्य शासनाचे निर्बंध लागू आहेत. त्यानुसार दिवसा तेरा तासांची मुभा मिळाल्याने वाहतुकीसह बाजारपेठेत फळे विकता येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
टंचाईच्या काळात पाण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी बाग जोपासली. प्रसंगी हातउसने पैसे घेऊन माल बाजारपेठेत दाखल करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पायपीटही केली. मात्र हे सर्व करूनही लॉकडाऊनमुळे अखेर टरबुजाला कमी भाव मिळाल्याचे आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील शेतकरी हनुमंत जाधव यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी त्यांनी शेततळे करत दोन एकर शेतामध्ये टरबुजाची लागवड केली. यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च शेततळ्यासह त्यांना आलेला आहे. टरबुजाची लागवड आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर व दर्जेदार बियाणे वापरत केली. ठिबक सिंचनाद्वारे जोपासना केली. जानेवारीत लागवडीवेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी असल्याने या पिकातून तरी दोन रुपये हातात मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र फळतोडणीला आले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय नियमानुसार आणि ठिकठिकाणी संचारबंदी तर कुठे लॉकडाऊन झाले. त्यामुळे या टरबुजाला मोठ्या शहरांमध्ये मागणी नसल्याने दर पडले. त्यामुळे हनुमंत जाधव यांनी घरासमोरच टरबुजाची विक्री सुरू केली यामधून किमान खर्च तरी निघेल अशी त्यांना अपेक्षा आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव नसता तर किमान सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मात्र या वर्षी झालेला पाच लाख रुपये खर्चही निघणे मुश्कील झाल्याचे हनुमंत जाधव म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत होईल
ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात रूढ होऊ लागली आहे मात्र महागडा केक आणण्याऐवजी मित्र परिवाराच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याऐवजी फळं कापून वाढदिवस साजरा करावा. ज्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैशांची मदत होईल.
-
विक्रम पोकळे, माजी शिक्षणाधिकारी
जाधव यांचा उदारपणा
आष्टी तालुक्यातील वटनवाडी येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत जाधव यांच्याकडे चिकूची बागदेखील आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी एक एकर चिकूची बाग त्यांनी सर्वसामान्यांसाठी खुली करून दोन महिने मोफत चिकू वाटप करून उदारतेचा परिचय दिला होता.
===Photopath===
050421\3155nitin kmble_img-20210405-wa0045_14.jpg