शेतात गाळ टाकताना टिप्परने काका-पुतण्यास चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 10:40 AM2019-02-07T10:40:18+5:302019-02-07T10:40:58+5:30
टिप्पर चालकाने सकाळी मागील चाकास रक्त पाहिले असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला.
केज (बीड ) : तालुक्यातील भाटुंबा येथील शेतात जवळबन येथील तलावातील टिप्परने गाळ टाकण्याचे काम बुधवारी रात्री चालू होते. यावेळी गाळ घेऊन आलेल्या टिप्परने शेतात झोपलेल्या काका पुतण्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
सर्जेराव धपाटे (४५) व परमेश्वर धपाटे (२३ ) असे मृतांची नावे असून ते काका-पुतण्या होते. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी धपाटे यांच्या शेतात जवळबन येथील तलावातील गाळ टाकण्याचे काम चालु होते.हे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. यामुळे सर्जेराव धपाटे आणि बंटी उर्फ परमेश्वर धपाटे हे शेतातच झोपी गेले. पहाटे टिप्पर गाळ घेऊन आले असता झोपेलेल्या काका- पुतने त्याच्या खाली चिरडले गेले.
टिप्पर चालकाने सकाळी मागील चाकास रक्त पाहिले असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याची माहिती टिप्पर मालकास दिली आणि तेथून पळ काढला. मालकाने सुपरवायझरला माहिती दिल्यानंतर त्यांनी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. याबाबत सध्या अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईल अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी दिली.