टिप्पर सोडला, ऑडिओ क्लिप व्हायरल; पण कारवाई होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:36+5:302021-08-19T04:36:36+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील धिर्डी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर कारवाई न करताच सोडून दिल्याचे समोर आले होते. ...
कडा : आष्टी तालुक्यातील धिर्डी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर कारवाई न करताच सोडून दिल्याचे समोर आले होते. शिवाय तो टिप्पर सोडण्यासाठी केलेली आर्थिक तडजोड व हप्तेखोरीबाबत दोन पोलीस अंमलदारांत झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल होऊनदेखील कारवाई झाली नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दोन अंमलदारांची पाठराखण होत असल्याचे दिसून येत आहे.
दहा दिवसांपूर्वी येथे पहाटे आष्टी ठाण्यातील पोलीस नाईक व अंमलदार या दोघांनी अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला. मात्र, कारवाई करण्याऐवजी तडजोड करून तो सोडून दिल्याचे समजताच ‘लोकमत’ने हा प्रकार समोर आणला. एवढेच नाही तर त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांत तो टिप्पर सोडण्यासाठी आर्थिक तडजोड झाल्याच्या संवादाची ध्वनिफीतही लोकमतच्या हाती लागली होती. याबाबत वृत्त प्रकाशित करून आष्टी ठाण्यात चाललेल्या गैरकारभाराकडे लक्ष वेधले होते. मात्र, उपअधीक्षकांनी अजून चौकशीही केलेली नाही. दहा दिवस उलटूनही कारवाई होत नसल्याने या प्रकरणाकडे वरिष्ठांनी डोळेझाक केल्याचे डघड होत आहे.
...
किती जणांना पाठीशी घालणार
मागील महिन्यात उपअधीक्षक यांच्या पथकातील एका अंमलदाराने व्हॉट्सॲपवर कारवाईसाठी रवाना असे स्टेट्स ठेवून अवैध धंदेवाल्यांना सूचक इशारा दिला होता. आता विनाकारवाई टिप्पर सोडण्यात आले. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली; पण अजून कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आणखी किती जणांना पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.