‘जीपीएस’मध्ये छेडछाडवाले टिप्पर ‘काळ्या’ यादीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:50 PM2019-11-12T23:50:33+5:302019-11-12T23:51:24+5:30
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी टिप्परवर जीपीएस यंत्र बसवण्यात आले होते. मात्र, या जीपीएस यंत्रामध्ये छेडछाड करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या यंत्रात छेडछाड करून बंद करणारे टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले होते.
प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी टिप्परवर जीपीएस यंत्र बसवण्यात आले होते. मात्र, या जीपीएस यंत्रामध्ये छेडछाड करणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या यंत्रात छेडछाड करून बंद करणारे टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले होते. दरम्यान परिवहन विभागाने कारवाई केली असून १३० पेक्षा अधिक टिप्पर ‘ब्लॅकलिस्टेड’ करण्यात आले आहेत.
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील हजारो ब्रास वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केली होती. परंतु त्यानंतर देखील मोठ्याप्रमाणात रात्रीच्या वेळी चोरट्यापद्धतिने वाळू वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून वाळू वाहतूक करणाºया टिप्परवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती. त्याचे सर्व माहिती ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लावलेल्या स्क्रिनवर दिसून येत होती. त्याठिकाणी टिप्परच्या सर्व हालचालीवल लक्ष ठेवण्यात येत होते. या जीपीएस प्रणालीमुळे मोठ्याप्रमाणात अवैध वाळू वाहतूक ीवर निर्बंध आले होते.
गेवराई तसेच माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू साठा व वाहतूक केला जातो. त्यामुळे या तालुक्यातील वाळू पट्ट्याचे कंत्राट झाल्यानंतर जी वाहने वाळू वाहतूक करतात त्यांच्या वाहनांवर जीपीएस यंत्र लावण्यात आले होते. तसेच रात्रीच्या वेळी पाडळशिंगी येथील टोलनाक्यावर तसेच इतर ठिकाणी महसूलचे पथक तैनात करण्यात आले होते. त्याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील स्क्रिनवरील देखील टिप्परच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. त्याचबरोबर शासननियमानूसारच वाळूची भरणी करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे अवैध वाळू वाहतूक रोखण्यास प्रशासनाला यश आले .
मात्र, मागील काही दिवसात काही टिप्परचालकांनी जीपीएस यंत्र काढण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आली. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने खणिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार ज्या टिप्परचालकांनी जीपीएस प्रणालीमध्ये छेडछाड केली आहे. त्यांना नोटीस देऊन खूलासा उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी यांनी मागवला. अशा प्रकारे दोन वेळा नोटीस देऊन देखील खूलासा सादर न करणाºया १३० पेक्षा अधिक टिप्परवर कारवाई करत ‘ब्लॅक लिस्टेड’ करण्यात आले आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हायवा, टिप्पर होणार जप्त
ज्या टिप्पर/हायवा चालक मालकांनी अशा प्रकार जीपीएस यंत्रासोबत छोडछाड केली आहे. ती वाहने जप्त करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागास दिले आहे. मात्र, मनुष्यबळ कमी असल्यामुळे हायवा/टिप्पर जप्त करण्यात आलेले नाहीत. परंतु आरटीओ कार्यालयातील कामे असतील तर ती कामे मात्र, होणार नाहीत. तसेच बँकेचे हप्ते, कर, फिटनेस यासंदर्भातील कामे देखील होणार नाहीत. त्यामुळे टिप्पर मालकांना खुलासा देणे आवश्यक आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.
विविध कारणांमुळे
जीपीएस यंत्रात बिघाड
हायवा/टिप्पर ही वाहने अवजड मालाची वाहतूक करतात, त्यामुळे अनेक वेळा गाडी धुणे,सर्विसिंग करणे या कामाच्या वेळी जीपीएस यंत्राला धक्का लागून ते निकामी होतात. तसेच त्यामध्ये बिघाड होऊन जीपीएस प्रणालीशी संपर्कं तुटू शकतो असा खुलासा काही टिप्पर चालकांनी दिला आहे. परंतु काही जणांनी मुद्दामहून छेडछाड केल्यामुळे खुलासा दिलेला नाही. त्यामुळे कारवाई होईल.